Video : पारशिवनीकरांना का भोगावी लागतेय "काळ्या पाण्या'ची शिक्षा?

रूपेश खंडारे
बुधवार, 29 जानेवारी 2020

पारशिवनी (जि. नागपूर) : शहरात नगरपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून पारशिवनीकरांना पाणीपुरवठा केला जातो खरा, पण नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दूषित असल्यामुळे नागरिकांना "काळ्या पाण्या'ची शिक्षा ठोठावली जात असल्याचे दिसून येते. या विरोधात नागरिक रोष व्यक्‍त करीत आहेत. मागील महिन्यात हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन लोकांनी आंदोलन केले, नगरपंचायत कार्यालयातला टाळे ठोकले. काही काळासाठी थातूरमातूर कारवाई करीत नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला. पुन्हा "जैसे थे' शिक्षा भोगण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

"काळ्या पाण्या'विरोधात नागरिकांत खदखद असताना त्यात नगरपंचायत सुधारणा करण्यास असमर्थ ठरत आहे. तेच काळे पाणी आजही नळाद्वारे पारशिवनीकरांना पाजले जात आहे. त्यामुळे येथील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अनेकांना विविध प्राणघातक आजाराला सामोरे जावे लागत आहे. यात सुधारणा करण्याकरिता नगरपंचायतकडे निधी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. तर दुसरीकडे पाइपलाइन बदलवण्याकरिता कोट्यवधी रुपये लागणार असल्याने ते आणायचे कुठून, हा प्रश्न असल्याचे सांगितले जाते.

दूषित पाणी; नगरसेवक, प्रशासन असमर्थ
आमदार ऍड. आशीष जयस्वाल यांनी पारशिवनीकरांसमोर शुद्ध पाणी देण्याच्या निवडणुकीत आणाभाका खाऊन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. परंतु या प्रश्‍नावर मात्र निवडून आल्यावरही ठोस काही होताना दिसत नाही. खासदार कृपाल तुमाने यांचे दर्शन मात्र या भागात दुर्लभ झाल्याने त्यांच्याप्रतीही नाराजीचा सूर आळविला जात आहे. नागरिकांच्या शुद्ध पाण्याच्या प्रश्न आजही सुटलेला नसल्याने पारशिवनीकर "काळ्या पाण्या'वर तहान भागवीत असल्याचे चित्र सद्यःस्थितीत पारशिवनी शहरात आहे.

Image may contain: 1 person, standing and outdoor

अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही, ही शोकांतिका
पारशिवनीकरांना दूषित पाणीपुरवठा केला जातो. नगराध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार असूनही येथील नागरिकांना दूषित काळ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हा तर आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. प्रशासकीय अधिकारी दिखावा करण्यापलीकडे काही करत नसल्याने आज ही परिस्थिती ओढवली. जनआक्रोश उफाळला. विरोध दर्शवून या विरोधात बंद पाळूनही लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही, ही शोकांतिका आहे.
-विजय बोथरा, सामाजिक कार्यकर्ते

शुद्ध पाणी पोहोचविण्याकरिता उपाययोजना नाही
नागरिकांना दूषित काळे पाणी प्यावे लागते, हे खरे आहे. त्याकरिता शहरातील जुनी पाइपलाइन बदलविणे गरजेचे आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च येणार आहे. सध्या नगरपंचायतकडे तेवढा पैसा नाही. संबंधित विभागाकडे याबाबत निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच नवीन पाइपलाइन टाकून काळ्या पाण्यापासून नागरिकांची मुक्‍तता केली जाईल. तोपर्यंत शुद्ध पाणी पोहोचविण्याकरिता दुसरी उपाययोजना नाही.
-प्रतिभा कुंभलकर, नगराध्यक्ष, पारशिवनी नगरपंचायत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: polluted water supply to citizens of parshivani