मृत्यूच्या दारातील कोरोनाबाधितांना मेडिकलचा रस्ता, मध्यरात्री रुग्ण हलविण्याचे प्रमाण अधिक

केवल जीवनतारे
Saturday, 28 November 2020

विदर्भात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाले आहेत. त्यातच शहरातील मेडिकलमध्ये १४००पेक्षा अधिक मृत्यू झाले, तर मेयोतही १२०० पेक्षा अधिक कोरोनाचे मृत्यू नोंदविले आहेत. त्यापाठोपाठ जिल्ह्यातील ११५ सरकारी व खासगी रुग्णालयात ९१० कोरोनाचे मृत्यू नोंदविले आहेत.

नागपूर : सर्वाधिक कोरोनाबाधितांवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल)मध्ये उपचार केले जात आहेत. दरम्यान, खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय घोषित करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असलेला कोरोनाबाधित अत्यावस्थ होताच त्या रुग्णाला मेडिकल व मेयोत रेफर करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.  विशेष म्हणजे, खासगीतून मेयो मेडिकलमध्ये रेफर करताना अतिशय क्लृप्त्या वापरण्यात येत होत्या. खासगीतून रेफर करण्यात आलेल्या बाधितांचे ९५ टक्के मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

विदर्भात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाले आहेत. त्यातच शहरातील मेडिकलमध्ये १४००पेक्षा अधिक मृत्यू झाले, तर मेयोतही १२०० पेक्षा अधिक कोरोनाचे मृत्यू नोंदविले आहेत. त्यापाठोपाठ जिल्ह्यातील ११५ सरकारी व खासगी रुग्णालयात ९१० कोरोनाचे मृत्यू नोंदविले आहेत. मात्र, उपचारादरम्यान अनेक कोरोनाबाधितांजवळचे पैसे संपल्यानंतर त्यांना मेयो किंवा मेडिकलमध्ये रेफर करण्यात येत असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली असून अशा अनेक रुग्णांना मेडिकल मेयोत रेफर करण्यात करण्यात येत होते. मेडिकल प्रशासनाने यासंदर्भात केलेल्या निरीक्षणात विविध सरकारी तसेच खासगी रुग्णालयातून सुमारे ३००च्या जवळपास रुग्णांना अत्यावस्थ स्थितीत हलवण्यात आले. त्यातील सर्वाधिक म्हणजे सुमारे २२५ रुग्णांना खासगी रुग्णालयातून येथे आले होते. एकट्या मेडिकलमधून २१४ जणांना हलविले. यातील १४४ जण खासगीतून हलवण्यात आले. त्यांना हलवण्यात आल्यानंतर लगेच काही तासांच्या अवधीत मृत्यू झाला.

हेही वाचा - पदवीधर निवडणूक: मतमोजणीला मोबाईल आणि टॅब नेण्यास मनाई; विभागीय आयुक्तांची माहिती 

मध्यरात्री रुग्णांना हलविण्याचे प्रमाण अधिक -
खासगी रुग्णालयात अनेक कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर असतानाही मध्यरात्री १२ नंतर मेडिकलमध्ये हलवण्यात आले. या रुग्णांना हलविण्यापूर्वी मेडिकल प्रशासनाला कुठलीही सूचना दिली जात नव्हती. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत होती. परंतु, या रुग्णांना स्वीकारून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. खासगीत मृत्यूचा टक्का कमी असल्याचे दाखवण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याची चर्चा मेडिकल वर्तुळात आहे. विशेष असे की, अनेक शासकीय रुग्णालयातून हलविलेल्या रुग्णांपैकी ४७ कोरोनाबाधित दगावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private hospitals refer serious corona infected patients to gmc nagpur