मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने जमवली कोट्यवधींची अपसंपदा, आता होतेय्‌ ही कारवाई...

Property misappropriation case filed against NMC employees
Property misappropriation case filed against NMC employees

नागपूर : महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण मधुकर गंटावार (वय 48) व त्यांच्या पत्नी शिलू प्रवीण गंटावार (वय 45, दोन्ही रा. फॉर्च्युन रेसिडेन्सी, रामदासपेठ) यांच्या फ्लॅटच्या झडतीदरम्यान एसीबीच्या पथकाला कोट्यवधींच्या संपत्तीचे दस्तऐवज आढळले. पोलिसांनी हे दस्तऐवज जप्त केले आहे.

गैरमार्गाने अडीच कोटींची मालमत्ता जमविल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. गंटावार दाम्पत्याविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात बुधवारी अपसंपदेचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच एसीबीच्या पथकाने गंटावार यांच्या रामदासपेठेतील फ्लॅट व कोलंबिया हॉस्पिटलची झडती घेतली. फ्लॅटच्या झडतीदरम्यान पथकाला हॉस्पिटलच्या जागेची सात कोटी रुपये किमतीची रजिस्ट्री, 2013 मध्ये 90 लाख रुपयांना घेतलेल्या फ्लॅटची रजिस्ट्री तसेच अन्य एका व्यक्तीच्या नावे असलेल्या भूखंडाचे दस्तऐवज आढळून आले.

दरम्यान, डॉ. गंटावार यांचे एलआयसी चौकातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियात दोन लॉकर असल्याची माहिती एसीबीच्या पथकाला मिळाली. लॉकरची झडती घेण्यासाठी एसीबीच्या पथकाने गंटावार यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, गंटावार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गुरुवारी डॉ. गंटावार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने डॉ. गंटावार दाम्पत्याला अटकपूर्व जामीन दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गंटावार दाम्पत्याने पदाचा गैरवापर करून कोट्यवधींची अपसंपदा जमविल्याची तक्रार 2015 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंटावार दाम्पत्याविरुद्ध आलेल्या तक्रारीची उघड चौकशी सुरू केली. 2007 मध्ये गंटावार हे महापालिकेच्या इंदिरा गांधी रुणालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते. 2007 ते डिसेंबर 2015 या कालावधीतील त्यांचे वेतन, उत्पन्न, चल व अचल संपत्ती, मालमत्ता विक्रीपासून मिळालेले उत्पन्न, मुदत ठेवीवरील रक्कम, व उत्पन्नाच्या स्त्रोतांची चौकशी करण्यात आली.

तसेच महापालिका, संबंधित बॅंक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भारतीय आयुर्विमा महामंडळ, मुलांच्या शैक्षणिक संस्थांकडून प्रवीण गंटावार यांच्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती मागवली. याशिवाय गंटावार दाम्पत्याच्या रामदासपेठेतील हॉस्पिटलच्या दस्तऐवजांचीही सखोल चौकशी केली. डॉ. प्रवीण गंटावार व त्यांच्या पत्नी डॉ. शिलू गंटावार यांनी लोकसेवक पदाचा गैरवापर करून दोन कोटी 52 लाख 85 हजार 762 रुपयांची अर्थात एकूण वैध उत्पन्नाच्या 43 टक्‍के अधिक अपसंपदा जमविल्याचे चौकशीदरम्यान समोर आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोनाली चौधरी, लक्ष्मण परतेती व गीता चौधरी यांनी गंटावार दाम्पत्याविरुद्ध सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये अपसंपदेचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com