कीड, अळीचा बंदोबस्त करायचाय...मग वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

1 लिटर अर्क 9 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी करावी. या अर्काची फवारणी खरिपातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांवर करता येते. 

नागपूर : कीड, अळीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. पेरणीनंतरच काही दिवसांनी निंबोळी अर्काची फवारणी केल्यास पिकांवर असलेली कीड, अळी नाश पावते. शेतकऱ्यांनी पेरणीनंतर 20 दिवसांनी व नंतर पुन्हा 20 ते 25 दिवसांच्या अंतरानी पिकांवर निंबोळी अर्काची फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!  

जिल्ह्यात गतवर्षीपासून निंबोळी गोळा करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. ग्राम पातळीवर कृषी सहायक हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून 5 क्विंटल निंबोळी गोळा करत आहेत. त्यानंतर त्याचा अर्क तयार करून त्याची फवारणीसाठी ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाते.

प्रथम 1-2 फवारणी जर निंबोळी अर्काची झाली, तर कीड नियंत्रणासोबतच शेतकाऱ्यांच्या खर्चाचीही बचत होते. यंदा खरीप हंगामात ग्रामीण भागात आजवर 50 क्विंटल निंबोळी गोळा केली आहे. याशिवाय गोंडखैरी येथील कृषी चिकित्सालयात यंदा 500 क्विंटलवर निंबोळी पावडर तयार करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी त्याचाही वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 

मिश्रण करण्याची पद्धत 
जमा केलेल्या निंबोळ्या वाळू घालून त्याचे पावडर तयार करावे. यानंतर 5 टक्के अर्कासाठी 5 किलो निंबोळी घेऊन ती बारीक करावी. फवारणी करण्याच्या एक दिवसापूर्वी ते पावडर 9 लिटर पाण्यामध्ये भिजू घालावे. 1 लिटरमध्ये 200 ग्रॉम सर्फ किंवा साबणीचा चुरा टाकावा. तो गाळून घेत एकूण मिश्रण 10 लिटर इतके करावे. 1 लिटर अर्क 9 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी करावी. या अर्काची फवारणी खरिपातील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांवर करता येते. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

पेरणीनंतर निरीक्षण करून प्रथम फवारणी 15 ते 20 दिवसांनी करावी. यानंतर दुसरी फवारणी 20 ते 25 दिवसांनी करावी. यामुळे पीक लहान असताना त्यावर लागणारी कीड, अळीचा नायनाट होतो. या निंबोळी अर्काच्या फवारणीने शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात पैशाचीही बचत होते. 
-मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protect crop by spraying `nimboli ark`