
काही युवक आपल्या आनंदासाठी इतरांच्या जिवाशी खेळत आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे अनेकांच्या आयुष्याची दोर तुटू लागली आहे. काहींना गंभीर जखमीही होण्याची वेळ आलेली आहे.
नागपूर : बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शहरातील नायलॉन मांजामुळे होणाऱ्या घटनांची न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. ॲड. देवेंद्र चौहान यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली असून गुरुवारी सुनावणी आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारी इमामवाडा परिसरात प्रणय ठाकरे या २१ वर्षीय युवकाचा नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काही युवक आपल्या आनंदासाठी इतरांच्या जिवाशी खेळत आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे अनेकांच्या आयुष्याची दोर तुटू लागली आहे. काहींना गंभीर जखमीही होण्याची वेळ आलेली आहे.
प्रणयचा मृत्यू हा शहरातील पहिलीच घटना नाही. या घटनेनंतर काही वेळातच मानेवाडा येथील सौरभ पाटणकर या २२ वर्षीय युवकाचाही नायलॉन मांजामुळे दुखापत झाली. त्याने वेळीच गळ्यापुढे हात धरला. त्यामुळे केवळ त्याच्या हाताला इजा झाली. डिसेंबर महिन्यात झिंगाबाई टाकळी परिसरात नायलॉन मांजामुळे अशीच एक घटना घडली होती.
याशिवाय पशू आणि पक्षीही या मांजामुळे जखमी होण्याचे प्रकार वाढू लागलेले आहेत. यामुळेच न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. देवेंद्र चव्हाण यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात नायलॉन मांजाच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, काही व्यापारी लपून नायलॉन मांजाची विक्री करतात. त्यांना महानगरपालिका अधिकारी व पोलिस मदत करतात. त्यामुळे शहरात नायलॉन मांजाची खरेदी-विक्री व वापर जोरात सुरू आहे. नायलॉन मांजाला विरोध करणाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी अधिकारी काही व्यापाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करतात. मोठ्या माशांना मात्र मोकळे सोडले जाते.