रेल्वेचे क्वारंटाईन कोच राहिले क्वारंटाईन

file photo
file photo

नागपूर : कोरोना विरोधातील युद्धाला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने अधिनस्थ विभागांना सज्जतेचे निर्देश दिले होते. त्यानुसार रेल्वे विभागाकडून रेल्वे डब्यांमध्येच क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले. मध्य रेल्वेने नागपूर स्थानकावर सुमारे दीडशे बेडची व्यवस्था असणारे ६० कोचेस जून महिन्यापासूनच तयार करून ठेवले आहेत. याशिवाय क्वारंटाईन सेंटरमध्येही दीडशे बेड सज्ज आहेत. महापालिका किंवा राज्य सरकारकडून मागणीच न झाल्याने ही संपूर्ण व्यवस्थाच ‘क्वारंटाईन' राहिली आहे. 

जून, जुलै महिन्यात कोरोनोबाधित आणि संशयितांची संख्या नागपूरसह देशभरात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून क्वारंटाईन सेंटरची संख्याही वाढविण्यात आली. सरकारच्या आवाहनानुसार भारतीय रेल्वेनेही पुढाकार घेतला. त्यावेळी रेल्वेगाड्या बंद होत्या. यामुळे रेल्वेडब्यांच्या संरचनेत बदल करून त्याला क्वारंटाईन सेंटरचे रूप देण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर गेलीच तर प्रसंगी याच ठिकाणी रुग्णांवर उपचारही करता येतील अशी व्यवस्था करून ठेवण्यात आली होती.

अजनी शेडमध्ये साठ डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला. मधले बर्थ हटवून रुग्ण राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली. गरजेच्या ठिकाणी हे डबे हलवले जाऊ शकत असल्याने ते उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षा होती. त्यासाठी फारसा खर्चही करण्यात आला नाही. शिवाय गरज संपल्यानंतर पुन्हा बर्थ जसेच्या तसे लावण्याची व्यवस्थाही पूर्वीच ठेवण्यात आली आहे. सर्व साठही डबे नागपूर स्टेशनवर आजही उभे आहेत. याशिवाय रेल्वे रुग्णालयात २०, अजनीतील आरपीएफ बरॅकसह वेगवेगळ्या चार ठिकाणी क्वारंटाईन सेंटर तयार केले गेले. त्यासाठीही उपलब्ध असणाऱ्या साहित्याचाच प्रामुख्याने उपयोग करून सुमारे दीडशे संशयित रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. गरज पडलीच तर रेल्वेचा डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट, कंपाउंडर, सफाई कामगारांना सेवा देता यावी, यादृष्टीने त्यांना प्रशिक्षणही दिले गेले. 

रेल्वेने सज्ज ठेवलेल्या व्यवस्थेच्या उपयोगासंदर्भातील निर्णय महापालिका व राज्य सरकारला घ्यायचा होता. रुग्णसंख्या वाढत असताना राज्य सरकारने उपचारासंदर्भात झपाट्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली. पहिले संशयित रुग्णांना, नंतर कोरोनाबाधित आढळलेल्या पण लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहून उपचाराची मुभा देण्यात आली. यामुळे रेल्वेच्या तयारीच्या उपयोगाची वेळच आली नाही. 


कोरोना विरोधातील लढ्यात सहभाग देत व्यवस्था सज्ज करून ठेवली. राज्य सरकारकडून मागणीच न झाल्याने त्याचा उपयोग होई शकला नाही. 
एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, नागपूर विभाग. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com