आला 'हिवसाळा', स्वेटर जॅकेटसह रेनकोटा घाला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

मध्य प्रदेशात व आजूबाजूच्या परिसरात ढगांची दाटी असल्यामुळे हवामान विभागाने विदर्भात हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता वर्तविली होती. बुधवारी सायंकाळी शहरात काही ठिकाणी शिडकावा झाल्यानंतर पहाटे अनेक भागांत दमदार सरी बरसल्या. त्याचवेळी शहरावर धुक्‍याची दाट चादरही पसरली. दुपारनंतर शहरावर धुके होते. 

नागपूर : वातावरणाचा आता काहीही भरोसा राहिलेला नाही. उन्हाळ्यात पाऊस पडतो तर पावसाळा कोरडा जातो. शेवटी-शेवटी मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाने नुकसान होते. त्यामुळे नेमका कोणता ऋतू सुरू आहे, असा प्रश्‍न नागरिकांच्या मनात उपस्थित होतो. यावरून सोशल मीडियावर चांगले जोक्‍स व्हायरल होतात. दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून, आणखी दोन दिवस असेच वातावरण राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे "आला "हिवसाळा', स्वेटर जॅकेटसह रेनकोटा घाला'' असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

बुधवारच्या ढगाळ वातावरणानंतर पाऊस, गारठा, धुक्‍याची चादर अन्‌ शिमला व काश्‍मीरचा आल्हाददायक "फील' असाच काहीसा अनुभव गुरुवारी नागपूरकर घेताहेत. शहरात पहाटेच्या सुमारास दमदार सरींनी हजेरी लावल्यानंतर दाट धुके पसरले. त्यामुळे वातावरण गारठले. विदर्भात पाऊस व ढगाळ वातावरण आणखी चोवीस तास कायम राहणार असून, त्यानंतर थंडीचा कडाका वाढणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. 

मध्य प्रदेशात व आजूबाजूच्या परिसरात ढगांची दाटी असल्यामुळे हवामान विभागाने विदर्भात हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता वर्तविली होती. बुधवारी सायंकाळी शहरात काही ठिकाणी शिडकावा झाल्यानंतर पहाटे अनेक भागांत दमदार सरी बरसल्या. त्याचवेळी शहरावर धुक्‍याची दाट चादरही पसरली. दुपारनंतर शहरावर धुके होते. पावसामुळे वातावरणात हवेत गारठा निर्माण झाला. त्यामुळे नागपूरकरांना स्वेटर व मफलर घालून फिरावे लागले. अगदी शिमला, पचमढी, काश्‍मीर व कुल्लू-मनालीसारखे आल्हाददायक वातावरण निर्माण झाल्याने नागरिक फेरफटका मारून वातावरणाचा आनंद घेत असल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळपासून नागपूरकरांना सूर्यनारायणाचे दर्शनच झाले नाही. 

अधिक माहितीसाठी - आता चिअर्सला नों लिमिट, या अल्कोहलचा लागला शोध

हवेत गारठा निर्माण झाला असला तरी नागपूरचा पारा मात्र पाच अंशांनी वाढला. बुधवारी 15.8 अंशांवर असलेले किमान तापमान गुरुवारी 20.6 अंशांवर स्थिरावले. शहरात सकाळी साडेआठपर्यंत 9.4 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात बुलडाणा, अमरावती, अकोल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्याचे वृत्त आहे. विदर्भात ढगाळ वातावरण आणखी चोवीस तास कायम राहणार असून, त्यानंतर थंडीचा कडाका वाढणार आहे. त्यामुळे सरत्या वर्षाचा "विकेंड' गारठणार, हे निश्‍चित आहे.

Image may contain: shoes and outdoor
पावसामुळे उमरेड बाजार समितीच्या आवारात ठेवलेला माल असा खराब झाला 

पावसामुळे नागपूरकर सूर्यग्रहणापासून वंचित

पाऊस व ढगाळ वातावरणामुळे नागपूरकरांना सूर्यग्रहणाचाही आनंद घेता आला नाही. सूर्यग्रहण आठ ते साडे अकरा या वेळेत दिसले. मात्र, या खगोलीय घटनेपासून त्यांना वंचित राहावे लागले. नागपूरकरांना विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणाचा आनंद घेता यावा, यासाठी रामन विज्ञान केंद्रात खास सोय करण्यात आली होती, हे उल्लेखनीय. गेल्या 58 वर्षांमधील सर्वात मोठे सूर्यग्रहण होते. आता नागपूरकरांना पुढील सूर्यग्रहणाचा आनंद येत्या 2029 मध्ये घेण्याची संधी मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainy season in Nagpur