युवा संशोधिकेची कमाल, शोधली बुरशीची दुर्मीळ प्रजाती, यासाठी ठरणार फायदेशीर

मंगेश गोमासे | Thursday, 10 September 2020

श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अश्वजित फुलझेले यांच्या मार्गदर्शनात डॉ. शीतल चौधरी या पीएच.डी.चे संशोधन करीत होत्या. पचमढीमधील जैवविविधतेवर आधारित त्यांच्या संशोधनाचा विषय होता. संशोधनादरम्यान मध्य भारतातील जैवविविधतेचे प्रमुख ठिकाण असलेल्या पचमढी येथे त्या जायच्या.

नागपूर  : एखाद्या पदार्थाला बुरशी लागली की फेकून देणे हाच एकमेव पर्याय असतो. मात्र, बुरशीचे काही प्रकार फायदेशीरही ठरू शकतात यावर कुणाला विश्वास बसणार नाही. अनेक उद्योगांमध्ये बुरशीमधील ‘सेल्युलोज' या जटील कर्बोदकाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अशाच उद्योगांना फायदेशीर ठरणाऱ्या बुरशीच्या दुर्मीळ प्रजातीचा शोध डॉ. शीतल चौधरी या युवा संशोधिकेने लावला आहे. त्‍यामुळे उद्योगांना मुबलक प्रमाणात ‘सेल्युलोज' उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अश्वजित फुलझेले यांच्या मार्गदर्शनात डॉ. शीतल चौधरी या पीएच.डी.चे संशोधन करीत होत्या. पचमढीमधील जैवविविधतेवर आधारित त्यांच्या संशोधनाचा विषय होता. संशोधनादरम्यान मध्य भारतातील जैवविविधतेचे प्रमुख ठिकाण असलेल्या पचमढी येथे त्या जायच्या. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांनी नमुने गोळा केले. 

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'
 

प्रयोगशाळेत या नमुन्यांची तपासणी केली असता त्यात त्यांना ‘किटोमियम मेड्यूसॅरम' नावाची बुरशीची दुर्मीळ प्रजाती आढळून आली आहे. तसेच ‘किटोमियम आरक्युएटस' व काही वर्गीकृत नसलेल्या परंतु मोठ्या प्रमाणात ‘सेल्युलोज'चे उत्पादन करणारी प्रजाती आढळून आल्या. विशेष म्हणजे ‘किटोमियम' हा एक बुरशीचा प्रकार असून त्यात असलेले ‘सेल्युलोज' उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

यात वस्त्रोद्योग, पेपर आणि पल्प उद्योग, डिर्टजन्ट पावडर, पशुखाद्य, अन्न व खाद्य उद्योग व अलीकडच्या काळातील बायोइथेनॉल उत्पादनांमध्ये हे रसायन गरजेचे असते. या बुरशीमुळे ‘सेल्युलोज'च्या नवीन स्रोताचा उपयोग करता येणे शक्य झाले आहे.

प्रतिजैविकाचाही शोध

संशोधनादरम्यान डॉ. चौधरी यांना मानवी शरीरात, त्वचारोग, न्यूमोनिया व डायरिया यांसारख्या रोगास कारणीभूत असलेल्या काही जिवाणूंची वाढ थांबवू शकणारी काही प्रतिजैविके (ॲन्टीबायोटीक) आढळून आली आहेत. सध्या या प्रजातींना कुठलेही नाव नसले तरी त्या या रोगावर फायदेशीर ठरणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले.