खरंच का सरकार! शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल का?

मनोज खुटाटे
Monday, 2 November 2020

ज्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण होऊन अहवाल शासनदरबारी पाठविण्यात आला, त्या पिकांच्या नुकसानभरपाईच्या अनुदानाची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. त्यात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली मदत नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार काय, या संभ्रमात शेतकरी आहेत. अशावेळी शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल कशी होईल, हा प्रश्‍न आहे.

जलालखेडा (जि.नागपूर): तालुक्यातील महत्वाचे पीक म्हणजे कापूस, सोयाबीन, संत्रा व मोसंबी आहे. या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. तरीपण सर्वेक्षणातून कापूस वगळल्यामुळे आधीच बऱ्याच शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ज्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण होऊन अहवाल शासनदरबारी पाठविण्यात आला, त्या पिकांच्या नुकसानभरपाईच्या अनुदानाची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. त्यात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली मदत नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार काय, या संभ्रमात शेतकरी आहेत. अशावेळी शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल कशी होईल, हा प्रश्‍न आहे.

अधिक वाचाः अचानक का गुदमरतोय श्‍वास? उमरेडकरांना आता नकोसे झाले वायुप्रदूषण !
 

विविध नवीन रोगांमुळे अतोनात नुकसान
नरखेड व काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे या वर्षातील खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या पिकांचे सतत होणाऱ्या पावसामुळे व विविध नवीन रोगांमुळे अतोनात नुकसान झाले. तसेच संत्रा व मोसंबी फळपिकांचाही आंबिया बहार गळाला, तर मृग बहार बहरलाच नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. नरखेड तालुक्यात १५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन या पिकांची पेरणी केली होती. या पिकाचे ऑगस्टमध्ये आलेल्या सततच्या पावसामुळे व येलो मोझाक किडीमुळे १०० टक्के नुकसान झाले आहे. पिकांची कापणी करून काढणी नुकसानाची ठरत असल्यामुळे शेतकरी पिकावरच रोटावेटर चालवीत आहे. कापूस पिकावर आलेल्या मर रोगांमुळे व अति पावसामुळे पिकाच्या बोन्ड्या सडत आहेत. तसेच पावसामुळे फुटलेला कापूसही ओला झाला असून तो अव्वाच्या सव्वा भावात विकावा लागत आहे. यामुळे आता कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नरखेड तालुक्यात १५ हजार हेक्टरवर संत्रा तर ६ हजार हेक्टरवर मोसंबीचे पिक घेतल्या जाते. मृगात पडलेल्या पावसाच्या अनियमितपणामुळे मृग बहार बहरलाच नाही तर असलेला आंबिया बहराचे फळाचे मोठ्या प्रमाणात बुरशीमुळे गळती झाली.

पिकाचे नाव     हेक्टरमधील लागवड       शेतकरी   अपेक्षित अनुदान (रुपयांमध्ये)
सोयाबीन        १५४९४.५९              २३०२८ १० कोटी ५४ लाख
फळपिक      ११८३४.०७                १३७११         २१ कोटी ३० लाख

              

अधिक वाचाः कारखान्याचे दूषित पाणी, तरिही संथ वाहते ‘वेणा’ माई !

शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहकार्य करावे
 नुकसानीची माहिती शासाकडे पोहचली आहे. यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी निधीची तरतूद करावी जेणेकरून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्राप्त होऊ शकेल. शेतकऱ्यांची आजची परिस्थिती ही अतिशय भीषण आहे. खरीप हंगामातील पिक विक्रीसाठी नसल्यामुळे त्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा दिवाळी सणसुद्धा अंधारात जाणार आहे. लोकप्रतिनिधींनी खरे वास्तव्य मुख्यमंत्र्यांना सांगावे व शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहकार्य करावे.
-वसंत चांडक
माजी सभापती, नरखेड

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Really government! Will farmers celebrate Diwali?