‘पोलिस मित्र’ नव्हे  हे तर  वसुली एजंट, वाचा हा स्पेशल रिपोर्ट 

अनिल कांबळे  
Thursday, 17 September 2020

तत्कालीन पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलिस मित्र संकल्पना साकारली होती. पोलिसांना कारवाई करताना युवकांची मदत व्हावी, असा प्रांजळ हेतू होता. मात्र, आता पोलिस मित्राच्या नावाखाली गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या बेरोजगार युवकांना पोलिस हाताशी धरतात आणि त्याचा वापर गैरप्रकारे करून वसुली करण्याचे काम करतात.

नागपूर : पोलिस स्टेशन, गुन्हे शाखा आणि वाहतूक विभागात ‘पोलिस मित्र’ नावाने शेकडो बेरोजगार युवक सामिल झाले आहेत. त्यांच्याकडे पोलिस विभागाचा शिक्का व अधिकाऱ्यांची सही असलेले ओळखपत्रही असते. आता याच पोलिस मित्रांचा वापर वसुली एजंट म्हणून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलिस मित्र संकल्पना साकारली होती. पोलिसांना कारवाई करताना युवकांची मदत व्हावी, असा प्रांजळ हेतू होता. मात्र, आता पोलिस मित्राच्या नावाखाली गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या बेरोजगार युवकांना पोलिस हाताशी धरतात आणि त्याचा वापर गैरप्रकारे करून वसुली करण्याचे काम करतात. पोलिस आयुक्त कार्यालय तसेच पोलिस उपायुक्त कार्यालयातून ‘पोलिस मित्र’ म्हणून युवकांना ओळखपत्र दिले जाते. 

त्यावर पोलिस आयुक्तांचा शिक्का आणि पोलिस लोगो असतो. त्यामुळे अनेक युवकांना वसुलीसाठी पोलिस मित्र बनण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. पोलिसांच्या पथकात समावेश व्हावा म्हणून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक अधिकाऱ्यांशी सेटिंग करून ओळखपत्राचे जुगाड करतात. त्यानंतर थेट जुगार अड्डे, वरली-मटका, दारूचे गुथ्थे येथे जाऊन वसुलीचे काम करतात. तसेच हॉटेल, ढाबा आणि फुटपाथवरील दुकानदारांकडूनही हे पोलिस मित्र वसुली करतात. तसेच लाच घेताना रंगेहात पकडले जाऊ नये म्हणून पोलिस मित्रांचा लाच स्वीकारण्यासाठी वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाची बातमी - अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना
 

एसएसबीतही शिरले पोलिस मित्र

शहरातील सेक्स रॅकेटची माहिती देणे तसेच त्यावर सापळा कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने काही पोलिस मित्र म्हणून युवकांना हाती धरले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून महिलांना पोलिस पथकात सामिल करतात. मात्र, कारवाई केल्यानंतर त्या सेक्स रॅकेट संचालकाकडून वसुली करण्यासाठी पोलिस मित्र आणि त्या सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर केला जातो. प्रीतीसारख्या महिलांना एसएसबी हातीशी धरते आणि मग याच महिला सेक्स रॅकेटकडून महिन्याकाठी लाखोंची वसुली करतात, अशी माहिती आहे.
 

वाहतूक शाखेतही शेकडोंनी भरणा

ट्रॅफिक पोलिस अवैध वसुली करण्यासाठी अनेक बेरोजगार युवकांना ‘एटीपी’च्या नावाखाली हाताशी धरतात. पोलिसांरखी केशरचना आणि खाकी पॅंटवर त्यांना बोलावण्यात येते. त्यांच्याकडे चालान फाडण्यासाठी पॉस मशीन, शिट्टी आणि वॉकिटॉकीसुद्धा दिला जातो. असाच प्रकार उघडकीस आल्याने वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अरुण बकाल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. प्रत्येक टोइंग व्हन, जॅमर व्हॅनमध्ये खासगी युवक वाहनात बसविले जाते. जॅमर लावल्यानंतर दंडाऐवजी थेट वसुली केली जाते, अशी माहिती आहे.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recovery agents become 'police friends', Including highly educated