खुशखबर! खुशखबर! तांदूळ, डाळीच्या भावात घसरगुंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

बाजारात सध्या तांदळाचे दर प्रतिक्विंटल 400 ते 500 रुपयांनी उतरले आहेत. तांदळाचे दर उतरल्याची गेल्या दोन वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. वार्षिक तांदूळ खरेदीसाठी हा काळ आदर्श आहे. सध्या श्रीराम तांदूळ 4500 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल आहे. डाळीचे दरही उतरले असून, खासकरून तूर आणि हरभरा डाळ स्वस्त आहे.

नागपूर : सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले असतानाच तांदळासह तूर, हरभरा डाळीचे दर प्रतिक्विंटल 300 ते 800 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असतानाच तांदळासह डाळीचे दर घसरल्याने ग्राहकांमध्ये समाधान आहे.
बाजारात सध्या तांदळाचे दर प्रतिक्विंटल 400 ते 500 रुपयांनी उतरले आहेत. तांदळाचे दर उतरल्याची गेल्या दोन वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. वार्षिक तांदूळ खरेदीसाठी हा काळ आदर्श आहे. सध्या श्रीराम तांदूळ 4500 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल आहे. डाळीचे दरही उतरले असून, खासकरून तूर आणि हरभरा डाळ स्वस्त आहे. तूर डाळ प्रति क्विंटल 6200 ते 8000 रुपये आहेत. यामुळे ग्राहकांनाही तांदूळ व डाळी खरेदी करण्यास हरकत नाही. नवीन तांदळाची आवक वाढली आहे. त्यामुळे तांदूळ महोत्सवाचे दिवस येणार आहेत. शहरातील होलसेल तांदूळ विक्रेते तांदूळ महोत्सवाचे दालन सुरू करण्याच्या तयारीत आहेत. या महोत्सवात ग्राहकांना अनेक प्रकारचे तांदूळ पाहावयास मिळतात. होलसेलमध्ये यंदा बासमती पावणेचार हजार ते सात हजार रुपये क्विंटलने विकला जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरात घसरण झाली. बासमती तुकडा, वनफोर, थ्रीफोर आणि मागेरा असे अनेक प्रकार उपलब्ध असून, ग्राहकांकडून या तांदळला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सविस्तर वाचा - अपमान सहन न झाल्याने केले असे

तांदळाचे दर का कमी झाले याबाबत विक्रेत्यांशी चर्चा केली असता पंजाब व उत्तर प्रदेशात तांदळाचे पीक भरघोस आले. याशिवाय तांदळाच्या निर्यातीवर आलेल्या मर्यादाही व्यापारी वर्गाच्या व उत्पादकांच्या पथ्यावर पडल्याने तांदळाचे दर कमी झाल्याचे बोलले जाते. शहरात गेल्या दोन-तीन वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने तांदूळ येत आहे. दर कमी असल्याने व्यापारीदेखील अधिक खरेदी करीत आहेत. बाजारात डाळीची आवक वाढल्याने तूर, हरभरा डाळीचे दर उतरले.
गेल्यावर्षी तूरडाळ प्रतिक्विंटल सहा हजार ते नऊ हजार रुपये होती. यंदा पाच हजार 500 ते आठ हजार रुपयांपर्यंत आहे. हरभरा डाळीचे भावही यंदा कमी आहेत. दोन्ही डाळींच्या हमीभावापेक्षा किंचित अधिक दर डाळींना मिळतोय. मूग डाळ , उडीद 100 रुपये किलो दराने किरकोळ बाजारात विकली जाते. तर सालासहित मूंग डाळ 70 तर उडीद 80 रुपये किलो आहे. या डाळींची आवक कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातसह विदर्भातून होते.
भावात घसरण
नवीन तांदूळ, डाळींची आवक सुरू आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यांचे भाव घटलेले आहे. ग्राहकांनाही तांदूळ व डाळी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. शिवरात्रीनंतर मागणीत वाढ होऊन किंचित भाव वाढू शकते. उत्पादन अधिक असल्याने जास्त भाव वाढेल अशी शक्‍यता कमीच आहे.
प्रताप मोटवानी, धान्य व्यापारी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice & Beans prices are down in marcket