प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू, सुरक्षात्मक उपाययोजनांना प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

प्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक कामाचा कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. शिकाऊ परवान्यासाठी 50 ते नियमित परवान्यासाठी 90चा कोटा असणार आहे. कार्यालयात भौतिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये सोमवारपासून नियमित कामकाजाला प्रारंभ झाला. नागपूर शहर, ग्रामीण आणि पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही वाहन परवान्याशी संबंधित कामे सुरू करण्यात आली आहेत. विविध कामांसाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेणारे उमेदवार आज कार्यालयात पोहोचले. सुरक्षात्मक उपाययोजनांकडे प्राधान्यक्रमाणे लक्ष दिले जात असल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी शिकाऊ परवान्याशी आलेल्या उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती. 

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून अत्यावश्‍यक कामे वगळता अन्य कामे थांबविण्यात आली होती. वाहन परवान्याचे नुतनीकरण, कायमस्वरूपी परवाने, शिकाऊ परवान्याची प्रकरणे खोळंबली होती. त्यासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये धाकधूक सुरू होती. कोरोनाचे संकट कायम असले तरी नियमांमध्ये शिथीलता आणली गेली आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर परिवहन विभागानेही खोळंबलेली कामे सुरू करण्याच निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारपासून वाहन परवाने, परवान्याची दुय्यम प्रत विषयक अर्ज, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन व परवाना विषयक सर्व कामे सुरू करण्यात आली असून वायुवेग पथकही सक्रीय करण्यात आले.

बारा वाजता भेटायला ये, अन्यथा ऍसिड हल्ला 

गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक कामाचा कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. शिकाऊ परवान्यासाठी 50 ते नियमित परवान्यासाठी 90चा कोटा असणार आहे. कार्यालयात भौतिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. केवळ अपॉईंमेंट असणाऱ्या उमेदवारांनाच कार्यालयाच्या आत सोडले जात आहे. आत शिरण्यापूर्वी थर्मल स्क्रिनिंग केले जाते. सॅनेटायझरने हाताचे निर्जंतूकीकरण करवून घेतले जाते. मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दोन उमेदवारांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर राहील, याची काळजी घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांनाही सुरक्षात्मक साधने देण्यात आली आहेत. 

पहिल्या दिवशी शहर कार्यालयात विविध प्रकारची एकूण 82 उमेदवारांची प्रकरणे हाताळली गेली. शिकाऊ परवान्यासाठी 37 उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. परवान्याचे नूतनीकरण 20, परवान्याची दुय्यम प्रत 03, लायसन्सशी संबंधित कामे 14 आणि 8 जणांची ट्रायव्हिंग टेस्ट घेण्यात आली. प्रकरणांच्या हाताळणीवर मर्यादा घालण्यात आल्याने गर्दीला आळा घालणे शक्‍य झाले आहे. असेच काहीसे चित्र शहरातील पूर्व नागपूर व ग्रामीण कार्यालयातही दिसले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rto Office resumed