विना अडथळा वाहतुकीचा साठ हजारांत सौदा अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

नागपूर : खासगी ट्रॅव्हल्स सुरळीत चालू देण्यासाठी 60 हजारांची लाच मागणारा प्रादेशिक परिवहन विभागाचा मोटार वाहन निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. शुक्रवारी सायंकाळी गीरीपेठेतील आरटीओ कार्यालयातच सापळा रचून त्याला लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. नरेश पोलानी (57, रा. हजारी पहाड) असे लाचखोर वाहन निरीक्षकाचे नाव आहे.

अवश्य वाचा - फुटपाथ दुकानदारच उभे झाले तुकाराम मुंढेंच्या विरोधात

नरेश पोलानी प्रादेशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक पदावर खुर्सापार चेक पोस्ट येथे कार्यरत आहे. या प्रकरणातील तक्रारदार पवनहंस ट्रॅव्हल्स कंपनीचे व्यवस्थापक आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये वास्तव्यास आहेत. ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस नागपूर-इंदूर दरम्यान खुर्सापार चेक पोस्ट मार्गे धावतात. पोलानी याने सर्व बसेस विना अडथळा जाऊ देण्यासाठी महिन्याचे 80 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. तो वारंवार पैशांची मागणी करीत होता.

तक्रारदाराने कंटाळून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक संदीप जगताप यांनी तक्रारीची गोपनीय शहानिशा केली. तक्रारीत सत्यता आढळून आल्याने सापळा रचण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पोलानी याच्यासोबत चर्चा केली. तडजोडी अंती 60 हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले.

झडप घालून घेतले ताब्यात

शुक्रवारी पैसे देण्याचे निश्‍चित झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सायंकाळी आरटीओ कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराने सोबत नेलेले 60 हजार रुपये पोलानीने स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. तातडीने सीताबर्डी ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर एक पथक पोलानी याच्या हजारीपहाड येथील घरी झाडाझडती घेण्यासाठी पोहोचले. उशिरापर्यंत ही झाडाझडती सुरू होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO's vehicle inspector into the trap of the ACB