माणुसकीच्या दुनियेत चमकला नाही हा 'सितारा', संघर्ष वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

अनिल कांबळे
मंगळवार, 21 जानेवारी 2020

आत्महत्या करून जीवन संपवून टाकावे, असे विचारांचे काहूर मनात गर्दी करत होते. परंतु, उच्चशिक्षित बनून आत्महत्या करायची नाही, हा विचार मनात पक्का केला आणि महाराष्ट्राच्या सीमेत दाखल झाली. सितारा मनातील भावनांना वाट मोकळी करून देत असताना डोळ्यांतील आसवांना मात्र रोखू शकली नाही.

नागपूर : जन्म कुठे व्हावा, हे आपल्या हातात नसते. जन्माने आपण काय व्हावे, हेदेखील आपल्या हाती नसते. परंतु, जे आयुष्य नशिबी आले, ते कसे जगायचे हे मात्र आपल्या हाती असते. हातावरील रेषा बघून नाही तर कर्तृत्वातून स्वतः ठरवायचे असते. जन्माने तृतीयपंथी झाले. मी बाई की माणूस, हे सांगता येत नाही. परंतु, माणसातील माणुसकी जिवंत असावी लागते. तृतीयपंथी नावाची भळभळती जखम माथ्यावर घेऊन एमए, बीएडची पदवी मिळवली. मात्र, जगाने अस्तित्वच नाकारले. हातात लेखणी घेऊन मुलांना शिकविण्याचा शिक्षकधर्म निभावत असताना सफल झालेल्या आयुष्याला नजर लागली. आता दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून बिदागी मागतेय... ही अवस्था आहे त्या तृतीयपंथीची. 

नाव सितारा जान... मूळची आंध प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील अनंतसागर गावची... वडील ऑर्केस्ट्रामध्ये नामवंत गायक. आई अंगणवाडीत चिमुकल्यांवर संस्कार करणारी सेविका. सिताराला तीन बहिणी आहेत. मोठी "नूर' व्यवसायाने शिक्षिका आहे. लहान बहीण यास्मिन एमटेक असून, बंगळुरूत नामांकित कंपनीत व्यवस्थापक आहे. लहान बहीण जुबेदा बारावीत शिकत आहे.

सविस्तर वाचा - रांगेत लागून बँकेत खाते उघडले; मात्र रक्कम काही जमा होईचि ना...

वडिलांच्या गायकीचा गुण मात्र "सितारा'मध्ये आला. बारावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. मात्र, शारीरिक बदलातून वर्गातील मुलांच्या चेष्टेचा विषय बनू लागली. मुलांकडून अपमान होत असतानाही शिक्षण मात्र सोडले नाही. यातना सहन करीत कला शाखेची पदवी संपादन केली. बीएड केले. शिक्षकी पेशा स्वीकारून मुलांना संस्काराचे धडे देऊ लागली. शिक्षणाची जिद्द असल्याने सिताराने अलाहाबाद विद्यापीठातून हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. नेल्लूर शहरात एका नामांकित शाळेत शिक्षक पदावर नेमणूक झाली. नोकरी आणि घरी शिकवणी घेत असल्याचे सितारा सांगत होती.

Image may contain: 1 person, smiling, closeup

विद्यार्थ्यांना शिकविण्यात मन रमले होते. आपल्याला समाजाकडून सन्मान मिळत असल्याची भावना मनात आली. मात्र, नियतीच्या मनात हे नव्हते. शाळेतील सहकारी शिक्षकांकडून टोमणे मारणे सुरू झाले. संस्कार, माणुसकीची शिकवण देणारे शिक्षक भेदाभेद करतील, असे वाटले नव्हते. काही शिक्षिकांनी जगण्याचे बळ दिले. मात्र, सहकाऱ्यांकडून मिळणारी हीन वागणूक अधिकच वाढत गेली. 

आत्महत्या करून जीवन संपवून टाकावे, असे विचारांचे काहूर मनात गर्दी करत होते. परंतु, उच्चशिक्षित बनून आत्महत्या करायची नाही, हा विचार मनात पक्का केला आणि महाराष्ट्राच्या सीमेत दाखल झाली. सितारा मनातील भावनांना वाट मोकळी करून देत असताना डोळ्यांतील आसवांना मात्र रोखू शकली नाही. नागपुरात आल्यानंतर सिताराला येथील किन्नर समाजाची स्थिती आपल्याहून वेगळी नसल्याचे दिसून आले. एकदा मिळालेला जन्म जगायचाच, हा निर्धार मनाशी केला. 

Image may contain: 1 person, closeup

समाजाने स्वीकारले नाही 
उच्चशिक्षित असूनही समाजाने मला स्वीकारले नाही. किन्नर म्हणून जन्माला आलोय; किन्नर म्हणूनच मृत्यू होईल. मात्र, समाजाने आम्हाला "एक्‍सेप्ट' केले आणि "रिस्पेक्‍ट' दिला तर आमचा किन्नर समाजही सन्मानाने जगू शकेल. समाजातील महिला-पुरुषामध्ये जी महत्त्वाकांक्षा असते, ती किन्नर समाजातही आहे. 
- सितारा जान, नागपूर

वेदनादायी क्षणांची आठवण

शिक्षक असताना दहावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ ठेवला होता. विद्यार्थ्यांनी ग्रुप फोटो काढण्यासाठी शिक्षकांना बोलावले. मात्र, मी विद्यार्थ्यांसोबत उभी राहताच शिक्षकांनी फोटो काढण्यास नकार दिला. शाळेचे प्रशासन शिक्षकांपुढे नमले. शिक्षकांकडून मिळालेला हा आघात हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवला आहे.

अधिक वाचा - फक्त पंधरा हजारांत तुमच्या मुलाच्या प्रेमप्रकरणाचा निपटारा करून देतो, मग...

मुलाखत घेण्यास नकार

नेल्लूर तालुक्‍यातील ही घटना. लिपिक पदासाठी लेखी परीक्षा दिली. उत्तीर्ण झाली. मात्र, माझ्यापेक्षा कमी गुण असणाऱ्यांना मुलाखतीसाठी बोलावले. ही माहिती लक्षात आल्यानंतर तेथे पोहोचली. केवळ तृतीयपंथी असल्याने मुलाखतीस नकार दिला. अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला असता, "सॉरी' म्हणत "तुमची मुलाखत घेऊ शकत नाही' एवढे बोलून निघून गेले. जगावे की मरावे, अशी हीन वागणूक तुमच्या समाजाकडून मिळते. सांगा आम्ही काय करावे? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sad story of Third party at Nagpur