
भिकारी हा शब्द उच्चारला की मनात दाढी वाढलेली, मळकट शर्ट, अंगावर किडे असे चित्र नजरेसमोर उभे राहते. परंतु, उपराजधानीतील पन्नासएक भिक्षेकऱ्यांना संस्थांचे प्रतिनिधी भेटले. त्यांच्या वेदनांवर फुंकर घातली. त्या भिक्षेकऱ्यांना खाऊ-पिऊ घातले. आंघोळ घातली. त्यांचे विस्कटलेले केस विंचरले. त्यांच्यावर संस्कार केले. ख्रिसमस डे निमित्त "भिकारी झाले गेस्ट' हा जनजागृती अभियान झिंगबाई टाकळी येथील भरतीय कृषी विद्यालयात राबविण्यात आला.
नागपूर : वर्ष संपायला आलं की, नाताळाची चाहूल लागते. "बाळ येशूचा जन्म झाला... असं संबोधित करणाऱ्या कॅरोल गाण्यांचे स्वर कानावर पडतात. हे आनंदाचे गीत गात रात्री कधीतरी सांताक्लॉज येतो. रंजलेल्या गांजलेल्यांना मदत करतो. ख्रिसमसच्या पर्वावर रस्त्याच्या कडेला फुटपाथवर, धार्मिक स्थळावरील भिक्षेकऱ्यांसह रस्त्यावर जगणाऱ्यांच्या आयुष्यात चार क्षणांचा आनंद घेऊन आधुनिक सांताक्लॉज आले अन् सर्वकाही बदलून गेले.
कसं काय बुवा? - 'आमटे आठवडा' म्हणजे काय माहिती आहे का? वाचा मग...
निमित्त होते "भिक्षेकरी झाले गेस्ट' या अभिनव अशा कार्यक्रमाचे. सकाळ माध्यम समूहाचे सकाळ सोशल फाउंडेशन, स्प्रेड आंतरराष्ट्रीय सोसायटी, भारतीय कृषी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "ख्रिसमस दिना'च्या पर्वावर हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. हे जनजागृती अभियान झिंगाबाई टाकळी येथील भारतीय कृषी विद्यालयात राबविण्यात आले. सारे भिक्षेकरी येथे प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेत होते.
भिकारी हा शब्द उच्चारला की, मनात दाढी वाढलेली, मळकट शर्ट, अंगावर किडे असे चित्र नजरेसमोर उभे राहते. परंतु, उपराजधानीतील पन्नासएक भिक्षेकऱ्यांना या संस्थांचे प्रतिनिधी भेटले. त्यांच्या वेदनांवर फुंकर घातली. त्या भिक्षेकऱ्यांना खाऊ-पिऊ घातले. आंघोळ घातली. त्यांचे विस्कटलेले केस विंचरले. त्यांच्यावर संस्कार केले. नवीन कपडे दिले. धार्मिक स्थळांपासून तर रस्त्यावर, फुटपाथवरील हे सारे भिक्षेकरी एकाच ठिकाणी आले. एकमेकांशी गप्पा मारल्या.
भिक्षेकऱ्यांचे केस कापण्यापासून तर त्यांना कपडे घालून देण्यापर्यंतचा सेवाधर्म निभावणारे आधुनिक सांताक्लॉज सुभाष गाडगे, पीयूष गाडगे, स्प्रेड आंतरराष्ट्रीय संस्थेचे विक्रांत ब्रेजिनल, रोहित वळवी, आकाश रायपुरे, प्रतीक तोरडे, रोशन वळवी, संजय कांबळे आहेत. महाकवी सुधाकर गायधनी, भारतीय कृषी विद्यालयातील मुख्याध्यापिका अर्चना पन्नासे, आंतरराष्ट्रीय सत्यशोधक संस्थेचे सुनील सरदार, समाजसेविका कोमल राऊत, समाजसेवक अमोल सरदार, सुहास वाकोडे, सकाळचे वितरण प्रतिनिधी नीलेश राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.
सामाजिक कार्यात सहभाग द्या
सरकारने भिक्षेकरी प्रतिबंध कायदा आणला आहे. मात्र, रस्त्यावर व फुटपाथवर मोठ्या प्रमाणात भिक्षेकरी दिसतात. सकाळ सोशल फाउंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम आहे. प्रत्येक संस्थेने पुढाकार घेऊन या सामाजिक कार्यात सहभाग द्यावा. तसेच हा उपक्रम नियमित राबवल्यास मोठ्या प्रमाणात भिक्षेकऱ्यांची संख्या कमी होईल. "सकाळ'चे मनःपूर्वक आभार.
- अर्चना मुकुंदराव पन्नासे,
मुख्याध्यापिका, भारतीय कृषी विद्यालय, झिंगाबाई टाकळी, नागपूर