घर हाकेच्या अंतरावर असताना चिमुकला स्कूलबसमधून उतरला अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

प्रफुल्लने जवळून जाणाऱ्या दुचाकी चालकाला थांबवून घेतले. त्याला सोबत घेऊन जाण्याची विनंती केली. यशला मागच्या सीटवर घेऊन मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्यावरही त्यांना यश आले नाही. घटनास्थळ यशच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. माहिती मिळताच यशचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले.

नागपूर : स्कूलबसच्या मागच्या चाकाखाली आल्याने आठवर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही दुदैवी घटना शुक्रवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास बजेरिया परिसरात घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्कूलबस वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून असुरक्षितपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याचे वास्तव उजेडात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्कूलबस चालक प्रफुल्ल गजानन मथुरे (वय 26, रा. नारा) याला अटक केली आहे. यश मेवालाल मिश्रा (वय 8, रा. तेलीपुरा बजेरिया) असे मृताचे नाव आहे. 

यश हा मोहननगर येथील ऑरेंज सिटी हायस्कूलचा तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता. त्याचे वडील मेवालाल रेल्वे स्टेशनवर मजुरीचे काम करतात. त्याला एक बहीण आहे. तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. दुपारी शाळा सुटल्यानंतर तो बसमधून घरी येत होता. चालकाने नेहमीप्रमाणेच संत्रामार्केटकडून लाल स्कूलच्या दिशेने जाताना मध्येच अरुंद असलेल्या दौलत पटेल चौकात बस थांबविली.

हेही वाचा - जेवणाकरिता बहिणीच्या घरी गेला अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकला...

यश उतरला असेल असे समजून बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण यश अगदी बससमोर उभा होता. बसची धडक लागल्याने तो खाली पडला. सावरण्यापूर्वीच मागचे चाक त्याच्या अंगावर आले. हे दृश्‍य बघणाऱ्यांनी आरडाओरड केला. यामुळे प्रफुल्लने गाडी थांबविली. खाली उतरून यश चाकाखाली आलेला दिसला. त्याचे शरीर संपूर्णत: रक्ताने माखले होते. तो विव्हळत होता.

Image may contain: 1 person, closeup
मृत यश मेवालाल मिश्रा

प्रफुल्लने जवळून जाणाऱ्या दुचाकी चालकाला थांबवून घेतले. त्याला सोबत घेऊन जाण्याची विनंती केली. यशला मागच्या सीटवर घेऊन मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्यावरही त्यांना यश आले नाही. घटनास्थळ यशच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. माहिती मिळताच यशचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. यानंतर गणेशपेठ पोलिसांचा ताफा दाखल झाला. त्यांनी चालकाला अटक करून गुन्हा दाखल केला.

पत्नीची बिघडली तब्येत अन्‌ झाला घात

प्रफुल्ल दररोज शाळेच्या बसमधूनच विद्यार्थ्यांची ने-आण करीत होता. ही बस प्रफुल्लच्या वडिलांच्या नावे असून, प्रफुल्ल स्वत: चालक म्हणून काम करायचा. तर त्याची पत्नी वाहक म्हणून काम बघायची. काल प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती घरीच होती. प्रफुल्ल एकटाच संपूर्ण जबाबदारी बजावत होता.

असे का घडले? - यवतमाळात कापूस खरेदीसाठी शेतकरी झाले आक्रमक
 

विरथ झाडे घटनेची पुनरावृत्ती

यश मेवालाल मिश्रा (वय आठ) असे या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने नऊ जानेवारी 2012 साली खानखोजेनगर परिसरात अशाच प्रकारे स्कूलबस खाली आलेल्या विरथ झाडे या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. डब्याचे झाकण चाकाखाली आल्याने विरथ ते उचलण्यासाठी गेला. त्यादरम्यान बस सुरू झाल्याने मागच्या चाकात येऊन विरथचा अपघात होत, मृत्यू झाला होता. तब्बल आठ वर्षांनी अशाप्रकारे पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती घडल्याचे दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School bus crushed the student in Nagpur