विद्यार्थ्यांच्या सारथींचा व्यावसायिक बाणा; स्कूल व्हॅनला दुकानाचे स्वरूप, शहरभर ‘शॉप ऑन व्हिल्स’ ​

योगेश बरवड
Saturday, 31 October 2020

जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न नसल्याने कमी दरातही ते उत्पादने विकण्यास तयार होतात. दराबाबत फारशी घासाघीस करीत नसल्यामुळे आपसूकच ग्राहकही त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. अनेकांना अल्पावधीत चांगले ग्राहकही मिळू लागले आहे. दिवाळीच्या तोंडावर ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत.

नागपूर : कोरोनाच्या भीतीने शाळा बंद आहेत. सात महिन्यांपासून स्कूल बसची चाकेही जागेवरच थांबली आहेत. विद्यार्थ्यांचे सारथी असणाऱ्या स्कूल व्हॅनचालकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मरता क्या न करता या म्हणीनुसार चालकांनी व्यावसायिकतेची कास धरली आहे. यावेळीही स्कूल व्हॅनच उपयोगाची सिद्ध झाली. त्यांचा दुकानांप्रमाणे उपयोग करण्यात येत आहे.

मार्च महिन्यापासूनच शाळा बंद आहेत. यामुळे स्कूल व्हॅन चालकांची मिळकत पूर्णपणे बंद आहे. प्रारंभीचे काही महिने व्हॅनचालकांनी कसेबसे ढकलले. परंतु, आता साठविलेला पैसाही संपला आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल होऊन उपराजधानीत व्यावसायिक उलाढालीने काहीसा वेग धरला आहे. बऱ्याच अंशी दिवाळीची खरेदीही सुरू झाली आहे. पण, शाळा सुरू होण्याची चिन्ह अद्यापही दिसत नाही. अशात व्हॅनचालक व्यवसायाकडे वळले आहेत. व्हॅनमध्येच दुकान थाटून जागेचा प्रश्न सोडविला.

क्लिक करा - जीवलग मित्राने दिला दगा; गर्भवती झाल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

शहरात स्कूल व्हॅनचालकांची संख्या सात हजारांहून अधिक आहे. त्यातील अनेकांनी अशी दुकाने शहराच्या जवळपास सर्वच भागांमध्ये सुरू केली आहेत. प्रामुख्याने सुका मेवा, चिक्की, प्लॅस्टिकची उत्पादने, रेडिमेड कपडे, अगरबत्ती, क्रॉकरी, जोडे-चपलासह विविध साहित्य विक्रीची छोटेखानी दुकाने त्यांनी सजविली आहेत.

काहींनी गृहउद्योग सुरू केला असून, त्यातही वाहन उपयोगी ठरले आहे. रस्त्याच्या कडेला पण रहदारीला कोणतीही अडचण होणार नाही यांची काळजी घेत आहेत. चाकांवरील ही दुकाने शहराच्या जवळपास सर्वच भागांमध्ये दिसून येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात निघालेले दिवाळे दिवाळीच्या काळात भरून निघेल, अशी उमेद या चालकांना आहे.

जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न नसल्याने कमी दरातही ते उत्पादने विकण्यास तयार होतात. दराबाबत फारशी घासाघीस करीत नसल्यामुळे आपसूकच ग्राहकही त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. अनेकांना अल्पावधीत चांगले ग्राहकही मिळू लागले आहे. दिवाळीच्या तोंडावर ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. अशात त्यांची उमेदही चांगलीच बळावली आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या संकटावर मात करत अमरावतीचे डॉक्टर घेताहेत महिन्याला तब्बल दहा लाख किलो चिकनचे उत्पादन

चालकांनी स्वबळावर छोटे व्यवसाय सुरू केले
स्कूल व्हॅनचालकांची अवस्था फार वाईट आहे. वार्षिक ४० ते ५० हजार सरकारच्या तिजोरीत भरणाऱ्या चालकांचा सरकारने कोणताच विचार केला नाही. उपासमारी टाळण्यासाठी चालकांनी स्वबळावर छोटे व्यवसाय सुरू केले आहे. अन्य घटकांप्रमाणेच शासनाने व्हॅनचालकांसाठीही आर्थिक सहायाची योजना आणावी.
- नितीन पात्रिकर,
शहर महामंत्री, भाजपा वाहतूक आघाडी

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school van become a running shop