
कोरोनानंतर सुरु झालेली बससेवा गावखेड्यांपासून दूरच; नागरिकांचे होताहेत प्रचंड हाल; अनेक फेऱ्या रद्द
जलालखेडा (जि. नागपूर ) : एकीकडे ‘गाव तेथे बस’ हे ब्रीद घेउन आपली बस देणाऱ्या राज्य परिवहन मंडळाने कोरोनाच्या काही काळाच्या लॉकडाउननंतर बससेवा सुरु केली. पण हे करताना त्यांनी त्यांच्या ब्रीदवाक्याला हरताळ फासण्याचे काम केले आहे. सध्या पूर्ण क्षमतेने बससेवा सुरु करण्यात आली असली, तरी मात्र नरखेड तालुक्यातील अनेक गावात बस पोहचली नाही. काही गावात फक्त एकच फेरी पाठविल्या जात असल्यामुळे गावकरी काळजीत आहेत. अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे कोरोनानंतर सुरु झालेली बससेवा गावापासून दूरच आहे.
‘गाव तेथे बस’ योजना सुरू असताना मात्र नरखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनानंतरही अद्याप महाराष्ट्राची लाईफलाइन मानली जाणारी एसटी बस अजूनही या गावच्या रोडवर धावली नाही. तालुक्यात अनेक गाव अडगळीत पडल्यासारखे आहेत. गावात कोणत्याही सुखसुविधा नाहीत. यामुळे या गावातील ग्रामस्थांना शासकीय अथवा खाजगी कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरात जावे लागते. पण आता बस त्यांच्या गावात जात नसल्यामुळे किंवा एक फेरी आली तर दुसरी फेरी येत नसल्यामुळे बाहेरगावी गेले तर परत कशाने यायचे, हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.
अधिक वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनलाही कमी भाव
नरखेड तालुक्यातील गावातील लोकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करूनसुद्धा त्यांच्या पदरी फक्त आश्वासनच मिळाली आहेत. पण त्या आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत सुद्धा झाली नाही. गावामध्ये आबालवृद्धांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. शासनाने दिलेल्या अर्ध्या तिकिटाचा उपयोग या लोकांना होत नाही. दुःखाच्या वेळीसुद्धा खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. रस्ता असूनसुद्धा या गावांमध्ये परिवहन महामंडळाची बस धावत नाही. बससेवा गावात सुरु नसल्यामुळे याचा आर्थिक भूर्दंड गावकऱ्यांना सहन करून आवश्यक त्याठिकाणी खासगी वाहनाने जावे लागत आहे.
काटोल आगाराच्या अनेक बसफेऱ्या आताही रद्दच
नरखेड व काटोल तालुक्यातील गावखेड्यापर्यंत प्रवाशांची नेआण करण्याचे कार्य काटोल आगारातील बस करीत होत्या. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही काळ बस सेवा पूर्णतः बंद होती. बससेवा सुरु केल्यानंतर याचा सर्वात जास्त फटका गाव खेड्यातील गावकऱ्यांना बसत आहे. त्यांच्या गावापर्यंत बस येत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
कोरोनामुळे बससेवा बंद होण्यापूर्वी काटोल आगाराच्या ७३ बस चालत होत्या. पण आता सध्या ५१ बस धावत आहे. यामुळे गावापर्यंत बस चालत नाही. काही गावात आधी दोन किंवा त्यापेक्षा जास्त बसफेऱ्या चालत होत्या. पण आता यातही कपात करण्यात आल्यामुळे फक्त एकाच फेरी बस चालत आहे.
जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला
आधी अनेक गावांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता बस चालत होती. पण सध्या शाळा बंद असल्यामुळे त्या बससेवा बंद करण्यात आल्या आहे. यामुळे अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या काटोल आगारातून ५१ बस धावत आहेत
श्री.रंगारी
आगारप्रमुख, काटोल
संपादन - अथर्व महांकाळ