नागपूरचे प्रेम काही कमी होईना, उत्पादन शुल्क विभागात अनेक 'चिपकू अधिकारी'

शुक्रवार, 19 जून 2020

मिळालेल्या माहितीनुसार येथील काहींचे दारूविक्रेत्यांशी हितसंबंध आहेत. अनेक जण तर पार्टनर असल्याची चर्चा आहे. बाहेर जिल्ह्यातील ज्या अधिकाऱ्यांचे विशेष प्रेम नागपूरवर आहे, तेही पार्टनर असल्याची चर्चा आहे.

नागपूर : उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी, कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातच ठाण मांडून बसले आहेत. यांचे अनेक विक्रेत्यांशी हितसंबंध असल्याने कारवाईवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. काहींची तर पार्टनशिप असल्याचेही बोलल्या जाते. 

शासनाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या विभागात उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. यामुळे शासनाचे सर्वाधिक लक्ष विभागाकडे असते. विभागातील अनेकांना बदलीच नको आहे. त्यामुळे "जुगाड तंत्र'चा उपयोग करून बदली रद्द करून घेतात किंवा दुसऱ्याची बदली करून घेतात. नागपूर जिल्ह्यात जवळपास दोन हजार अधिकारी, कर्मचारी आहेत. यातील अनेक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून येथेच आहेत.

क्लिक करा - "ते' दृष्य पाहून मजुराची गेली तळपायातली आग मस्तकात, केली शेतमालकाची हत्या, काय होते कारण...

दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाल्यावर लगेच पुन्हा "जागा' करून घेतात. काही अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर "नागपूर'चे प्रेम कमी झाले नसल्याचे समजते. इतर जिल्ह्यात असतानाही येथील घडामोडींवर विशेष लक्ष असते. मिळालेल्या माहितीनुसार येथील काहींचे दारूविक्रेत्यांशी हितसंबंध आहेत. अनेक जण तर पार्टनर असल्याची चर्चा आहे. बाहेर जिल्ह्यातील ज्या अधिकाऱ्यांचे विशेष प्रेम नागपूरवर आहे, तेही पार्टनर असल्याची चर्चा आहे.

या विभागात स्थानिक आणि बाहेरील असे दोन गट असल्याचे समजते. या गटबाजीमुळे कारवाईवर परिणाम होत आहे. एका गटाकडून दुकानावर कारवाईची तयार असताना दुसऱ्या गटाकडून संबंधितास माहिती पुरविण्यात येते. तर काहींकडून तक्रारीचाही वापर करण्यात येत असल्याची चर्चा आहे. विभागातील गटबाजीचे प्रकरण जिल्हाधिकारी आणि मुंबईपर्यंत पोहोचल्याचे आहे.