खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा? जिल्ह्यात ६५ हजार क्विंटलची गरज

Shortage of soybean seeds during kharif season
Shortage of soybean seeds during kharif season

हिंगणा (जि. नागपूर) : खरीप हंगामात सोयाबीनचे पीक शेतात डोलत असताना कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला. परिणामी सोयाबीन पिकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली. आगामी वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकांचा तुटवडा जाणवणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले. जिल्हा प्रशासनाने आयोजित कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. जिल्ह्यात ६५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज आहे. याच्या उपलब्धतेसाठी बैठकीत विचारमंथन झाले.

जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ऑगस्ट महिन्यात सोयाबीन पिकाची स्थिती उत्तम होती. मात्र सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे किडी-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ८० टक्के सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक न काढता ट्रॅक्टर फिरविला. यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात कमालीची घसरण झाली.

थोड्याफार प्रमाणात आता सोयाबीन जिल्ह्यात शिल्लक राहिले आहे. हे शिल्लक असलेले सोयाबीन बियाणे म्हणून वापरता येईल का, याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत उमरेड, हिंगणा, काटोल, कळमेश्वर, सावनेर, नागपूर व भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादनाच्या पिकासंदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या माहितीनुसार ६५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज जिल्ह्यात आहे. यावर्षी प्रथमच उत्पादनात घट झाल्याने बियाणे उपलब्ध होणार का, हा गंभीर प्रश्न कृषी विभागासमोर उभा टाकला आहे. यामुळे उपलब्ध असलेले सोयाबीन अभियानासाठी ठेवता येणार का, याबाबत बाजार समितीच्या सचिवांची चर्चा करण्यात आली.

आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी व्यक्त केले. कृषी विभागाच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात ३० हजार क्विंटल चांगल्या प्रतीचे सोयाबीन उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

त्यांना तालुक्यात ८६ शेतकऱ्यांकडे जवळपास ७९५ क्विंटल सोयाबीन असल्याची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले सोयाबीन बाजार समितीमध्ये कशाप्रकारे आणता येईल, यासाठी बाजार समिती प्रशासनाने प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

सोयाबीन शेतमाल तारण कर्ज योजना राबविणार
जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने यावर उपाययोजना म्हणून बाजार समितीमार्फत सोयाबीन शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून सोयाबीन तारण कर्ज योजनेत कशाप्रकारे आणता येईल. यासाठी बाजार समिती प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन व्यापाऱ्यांना न विकता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तारण कर्ज योजनेसाठी आणावे, असे आवाहन करण्यात आले‌‌.
- किरण काकडे,
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणा

पाच हजार शेतकऱ्यांकडे उत्तम प्रतीचे बियाणे
जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन पिकाचे उत्पादन घटले आहे. यामुळे सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवू नये यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांकडे उत्तम प्रतीचे बियाणे असल्याची माहिती मिळविली आहे. याबाबतची नोंद कृषी विभागाकडे आहे. यामुळे या शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्री न करता बियाणे म्हणून वापरावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कंपनीकडून बियाणे विकत घेण्यापेक्षा शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापरावे, यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या या मोहिमेला शेतकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावे, असे आवाहन केले.
- मिलिंद शेंडे,
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com