व्याघ्रदर्शनाने सुखद धक्का, पेंचमध्ये सिल्लारी, खुर्सापार प्रवेशद्वाराने गेलेल्यांना लाभ

राजेश रामपूरकर
Monday, 5 October 2020

पेंच व्याघ्र प्रकल्पात सिल्लारी, सुरेवाणी, कोलितमारा, खुर्सापार, नागलवाडी या प्रवेशद्वारातून पर्यटन सुरू झालेले आहेत. त्यातील सिल्लारी आणि खुर्सापार या प्रवेशद्वाराला पर्यटकांची पहिली पसंती असते. यंदा पर्यटन सुरू होताच वाघाचे दर्शन झाल्याने येथील निसर्ग पर्यटनाला चांगले दिवस येतील

नागपूर : निसर्ग पर्यटन एक ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी आणि खुर्सापार या दोन्ही प्रवेशद्वारातून पर्यटनाला गेलेल्यांना पर्यटकांना वाघांचे दर्शन झाले. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांवरून सलग तीन दिवसात साडे तीनशेपेक्षा अधिक पर्यटकांनी व्याघ्र दर्शनाचा आनंद लुटला. कोरोनाच्या वातावरणात जगणाऱ्या व्याघ्र प्रेमींना हा सुखद धक्का आहे. 

ताडोबानंतर महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या दृष्टीने सर्वात चांगले जंगल ठरले आहे. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी सह्याद्री वगळता ताडोबा, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा व बोर असे पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. वन्यप्राण्यांच्या ‘सहज’ दर्शनासाठी विदर्भातील ताडोबा पाठोपाठ आता पेंचचाही समावेश झालेला आहे. वाघ हे या जंगलाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय चितळ, सांबर, गवे यांचे मोठमोठे कळप दिसून येतात. सागवान आणि बांबूच्या झाडांनी समृद्ध असा हा प्रदेश आहे. ७४१ चौरस कि.मी. क्षेत्रफळाच्या या उद्यानाचा ९० टक्के विस्तार मध्य प्रदेशात असून उर्वरित १० टक्के विस्तार महाराष्ट्राच्या हद्दीत येतो.

हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास लागणार सहा महिने

पेंच व्याघ्र प्रकल्पात सिल्लारी, सुरेवाणी, कोलितमारा, खुर्सापार, नागलवाडी या प्रवेशद्वारातून पर्यटन सुरू झालेले आहेत. त्यातील सिल्लारी आणि खुर्सापार या प्रवेशद्वाराला पर्यटकांची पहिली पसंती असते. यंदा पर्यटन सुरू होताच वाघाचे दर्शन झाल्याने येथील निसर्ग पर्यटनाला चांगले दिवस येतील असे बोलले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पर्यटन सुरू झालेले असून ५० टक्के सफारी वाहनांची बुकिंग करण्यात येत आहे. या दोन्ही प्रवेशद्वारातून क्षमतेनुसार पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे.सिल्लारी पर्यटन संकुलात फक्त ३० टक्केच क्षमतेमध्ये निवासाची परवानगी दिलेली आहे. गाइड, सर्व पर्यटक, वाहन चालकांचे थर्मामिटर गनने तापमान मोजण्यात येत आहे. याशिवाय इतर नियमांचीही अंमलबजावणी केली जात आहे. 

 
पर्यटनाकडे कल 

राज्य शासनाने निसर्ग पर्यटनाला हिरवी झेंडी देताच पर्यटकांनी आपला मोर्चा जंगलाकडे वळविला आहे. यामुळे गेल्या सहा महिन्यापासून अडचणीत सापडलेल्या पर्यटन व्यवसायाला उभारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. काही नियम क्लिष्ट असले तरी पर्यटक निसर्ग पर्यटनाला साद घालतील. स्वानंद सोनी, संचालक, सृष्टी जंगल रिसॉर्ट, सिल्लारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Sighting of a Tiger in Pench Delighted the Tourists