स्वप्नपुर्तीसाठी नागपूरची कोण गेली अमेरिकेला… वाचा सविस्तर

file photo
file photo


नागपूर  : बास्केटबॉलमध्ये करिअर करायचे असेल तर, या पृथ्वीतलावर बास्केटबॉलची नर्सरी मानल्या जाणाऱ्या अमेरिकेशिवाय दुसरं चांगलं ठिकाण कुठेही नाही. अशा ठिकाणी अवघ्या १७ व्या वर्षी नागपूरच्या एका मुलीला संधी मिळणे, ही निश्चितच अभिमानाची बाब म्हणता येईल. सीया देवधरच्या कामगिरीने प्रभावित होऊन तेथील एका अकादमीने शिष्यवृत्ती दिल्यानंतर सीया नुकतीच अमेरिकेत दाखल झाली. अमेरिकेत आता तिला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात आधुनिक प्रशिक्षणासोबतच शालेय व महाविद्यालयीन शिक्षणही मिळणार आहे. 

सीयाची आतापर्यंतची चमकदार कामगिरी पाहून विचिता (कॅन्सस) येथील लाईफ प्रेप अकादमीचे मुख्य प्रशिक्षक जेफ्री हेन्री व एनबीएचे ग्लोबल डायरेक्टर ब्लेअर हार्डीक यांनी गेल्या जुलैमध्ये तिला शिष्यवृत्तीची ऑफर दिली होती. करिअरला कलाटणी देणारी चांगली ऑफर असल्यामुळे तिने लगेच स्वीकारली आणि अमेरिकेत दाखलही झाली. अमेरिकेतील मुक्कामादरम्यान सीयाला तेथील तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे. अकादमीत जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा असल्यामुळे सीयाला स्वतःच्या खेळात सुधारणा करण्याची व आयुष्यात गरूडझेप घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. प्रशिक्षणासोबतच ती शालेय स्पर्धा तसेच हुप्स क्लबकडून आंतरक्लब स्पर्धेतही खेळणार आहे. याशिवाय तिचे शिक्षणसुद्धा अमेरिकेतच होणार आहे. सीयाच्या राहण्या-खाण्याची तसेच निवासाची सर्व सोय अकादमीतर्फे करण्यात येणार आहे. शिवाजीनगर जिमखानाची बास्केटबॉलपटू असलेल्या सीयाने चांगली कामगिरी केल्यास भविष्यात तिला तेथील कॉलेजकडून व नंतर प्रतिष्ठेच्या महिलांच्या एनबीएमध्येही संधी मिळू शकते. 


अकादमीकडून शिष्यवृत्ती मिळणारी सीया ही महाराष्ट्रातील एकमेव महिला बास्केटबॉलपटू आहे. आतापर्यंत भारतातील केवळ चार खेळाडूंना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. पंजाबच्या अस्मत कौर व हरसिमरन कौर आणि केरळच्या ॲन मेरी झाचारियाह यांना हा मान मिळालेला आहे. सेंटर पॉइंट शाळेची विद्यार्थिनी असलेली सीया शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते शत्रुघ्न गोखले व विनय चिकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा वर्षांपासून शिवाजीनगर जिमखाना येथे सराव करीत आहे. सीयाने राष्ट्रीय स्पर्धेत अनेकवेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. गतवर्षी एनसीसीए नेक्स्ट जनेरशन शो केससाठी सात भारतीय खेळाडूंमध्ये सीयाची निवड झाली होती. याशिवाय टोकियो (जपान) येथील बास्केटबॉल विदाउट बॉर्डर आशिया कॅम्पसाठीही तिची निवड झाली होती. 

सीयाची अमेरिकेतील एका प्रतिष्ठेच्या अकादमीसाठी निवड होणे, ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या शिष्यवृत्तीने तिच्या करिअरला निश्चितच वेगळी कलाटणी मिळणार आहे. प्रत्येक बास्केटबॉलपटूंचे अमेरिकेत खेळण्याचे स्वप्न असते. सीयाला कमी वयातच ही संधी मिळाली आहे. या संधीचे ती सोने करून आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेईल, अशी मला खात्री आहे.' 
-शत्रुघ्न गोखले, सीया देवधरचे प्रशिक्षक  

संपादन : नरेश शेळके 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com