नितीन गडकरी म्हणतात, कौशल्य विकासातून मनुष्य आत्मनिर्भरतेकडे 

राजेश चरपे
Tuesday, 10 November 2020

आजच्या स्थितीत संशोधन, उद्यमशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य आणि यशस्वी प्रयोग म्हणजे ज्ञान होय. या ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची ही वेळ आहे

नागपूर : कौशल्य विकास आज देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण विविध क्षेत्रांतील कौशल्य हे देशातील ग्रामीण आणि मागास भागात पोहाचले पाहिजे. त्यामुळे मागास भागाचा विकास होईल आणि रोजगाराची समस्या नियंत्रणात येईल, असे मत केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

‘स्कील टेबल बूक’चे प्रकाशन ना. गडकरी यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आजच्या स्थितीत संशोधन, उद्यमशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य आणि यशस्वी प्रयोग म्हणजे ज्ञान होय. या ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ हे आज देशासाठी आणि विविध उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 

जाणून घ्या - आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून
 

कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी प्रशिक्षण घेतल्याशिवाय कौशल्य मिळविता येत नाही. आणि कौशल्य मिळविण्यासाठी कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. कौशल्य विकास हा आत्मनिर्भरतकडे जाणारा एक मार्ग आहे, असेही ते म्हणाले.

सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांसाठ़ी कौशल्य विकास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले, एमएसएमईचा जीडीपी आज ३० टक्के आहे, ४८ टक्के निर्यात तर ११ कोटी रोजगार या विभागाने निर्माण केले आहे. आज आापली ग्रामीण अर्थव्यवस्था ही फक्त ८० हजार कोटींची आहे. 

येत्या दोन वर्षात ती पाच लाख कोटींची करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढणार आहे. रोजगार निर्मितीला आमचे अधिक प्राधान्य आहे. विविध क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य लागते. त्यामुळे याबद्दल जनतेत जागरूकतेची मानसिकता तयार करावी लागेल, असेही गडकरी म्हणाले. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Skill development reach out to rural areas, Nitin Gadkari