Video : या देशातही आहे ब्रुसली, वय वर्ष अवघे पाच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 December 2019

राघव अडीच वर्षांचा असताना आई-वडिलांनी त्याला कराटे क्‍लासला लावले. राघवचे वय लक्षात घेता त्याला विदर्भ कराटे असोसिएशनचे सचिव व कराटे प्रशिक्षक विजय घिचारे यांनी प्रवेश नाकारला. मात्र, पालकांच्या आग्रहास्तव त्यांनी राघवला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली. घिचारे यांनी राघवरवर खूप मेहनत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात धडे गिरवत राघव अल्पावधीतच कराटेमध्ये निपुण झाला. 

नागपूर : केवळ पाच वर्षांच्या मुलाने अवघ्या एका मिनिटात तब्बल सव्वाशे टाइल्स फोडल्या. हे वृत्त वाचून साहजिकच कुणालाही नवल वाटेल. मात्र, हे खरे आहे. हा भीमपराक्रम करून दाखविला नागपूरचा छोटा ब्रुसली राघव भांगडे याने. त्याने न थकता केवळ मिनिटाभरात तब्बल 125 टाइल्स फोडून जागतिक विक्रमाची नोंद केली. आतापर्यंत कुणीच इतक्‍या कमी वेळात एवढ्या "टाइल्स' फोडल्या नाहीत, हे उल्लेखनीय. राघवच्या या विक्रमी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - तो पंचावन वर्षांचा ती नऊ वर्षांची अन्‌...

भवन्स सिव्हिल लाइन्समध्ये के. जी. टूमध्ये शिकणाऱ्या राघवने रविनगर येथील सी. पी. ऍण्ड बेरार शाळेत आयोजित कराटे परीक्षेदरम्यान आयोजित विशेष प्रात्यक्षिकाच्यावेळी हा पराक्रम केला. लहानगा राघव हा विक्रम करणार की नाही, याबद्दल उपस्थितांमध्ये उत्सुकता होती. मात्र, "वंडरबॉय' राघवने कोवळ्या वयालाही मात देत टेबलवर ठेवलेल्या सिमेंटच्या दीडशेपैकी सव्वाशे टाइल्स विद्युतगतीने पटापट फोडून उपस्थितांची मने जिंकली. 

Image may contain: 2 people, people smiling

राघवचा हा पराक्रम "याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे, सामाजिक न्याय विभागाचे डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश आंभोरे, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सर्वेश्‍वर कसारला व रेकॉर्डची नोंद ठेवणारे गौरव यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राघवचा "टाइल्सफोड' पराक्रम बघून सारेच अवाक्‌ राहिले. इतक्‍या कमी वयात केलेल्या या कामगिरीबद्दल सर्वांनीच त्याचे अभिनंदन व कौतुक केले. राघवच्या या कामगिरीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. विक्रमाबद्दलचे प्रमाणपत्र लवकरच राघवला मिळणार आहे. 

क्लिक करा - आला 'हिवसाळा', स्वेटर जॅकेटसह रेनकोटा घाला

राघव अडीच वर्षांचा असताना आई-वडिलांनी त्याला कराटे क्‍लासला लावले. राघवचे वय लक्षात घेता त्याला विदर्भ कराटे असोसिएशनचे सचिव व कराटे प्रशिक्षक विजय घिचारे यांनी प्रवेश नाकारला. मात्र, पालकांच्या आग्रहास्तव त्यांनी राघवला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली. घिचारे यांनी राघवरवर खूप मेहनत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात धडे गिरवत राघव अल्पावधीतच कराटेमध्ये निपुण झाला.

अभ्यासात हुशार असलेल्या राघवने आतापर्यंत भूतान व गोवा येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये दोन सुवर्णांसह एक रौप्यपदक जिंकले आहे. याशिवाय राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्येही अनेक पदके जिंकून आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली. राघवचे वडील साहिल भांगडे हे प्रसिद्ध वकील असून, त्याला भविष्यात वडिलांप्रमाणे चांगला वकील व्हायचे आहे. 

Image may contain: 1 person, eyeglasses and closeup

अल्पावधीतच स्वत:ला केले सिद्ध 
माझ्याकडे राघव पहिल्यांदा सरावासाठी आला तेव्हा, तो कराटे शिकेल की नाही याबद्दल मी थोडा साशंक होतो. मात्र, त्याच्यातील "एनर्जी' आणि "स्टॅमिना' बघून मी खूप प्रभावित झालो. अल्पावधीतच त्याने स्वत:ला सिद्ध केले. राघव अतिशय मेहनती असून, त्याच्यात उंच शिखर गाठण्याची क्षमता आहे. नियमित सरावानंतर तो दोनशे किंवा तीनशेही "टाइल्स' फोडून स्वत:चाच विक्रम मोडू शकतो. 
- विजय घिचारे, 
राघवचे प्रशिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: small Bruce Lee in Nagpur burst 125 tiles in minutes