स्मार्ट पार्किंगची कुणी लावली वाट?

Smart parking stuck due to depression
Smart parking stuck due to depression

नागपूर : राज्यातील पहिल्या स्मार्ट पार्किंग प्रकल्पाला उदासिनतेचे ग्रहण लागले असून महापालिका वाहतूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे चांगल्या प्रकल्पाची 'वाट' लागली आहे. प्रकल्प पूर्ण होऊन दोन वर्षे झाली. परंतु आयुक्त व पदाधिकाऱ्यांतील वादाने पार्किंगची अडचण दूर करणाऱ्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले असून चांगल्या सुविधेपासून नागपूरकरांना वंचित राहावे लागत आहे. 

रामदासपेठेतील वर्दळीच्या सेंट्रल बाजार रोडवर काचीपुरा चौक ते हॉटेल तुली इम्पेरिअलपर्यंतच्या पाचशे मीटर अंतरात स्मार्ट पार्किंग तयार करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पहिली स्मार्ट पार्किंग नागपुरात व्हावी, या हेतूने 140 कोटींचा स्मार्ट ऍन्ड सेफ सिटी प्रकल्प मंजूर केला होता. यात पार्किंगसह स्मार्ट स्ट्रिटचाही समावेश होता.

नागपूर स्मार्ट सिटी ऍन्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने स्मार्ट ऍन्ड सेफ सिटीअंतर्गत एलऍन्डटी कंपनीला स्मार्ट पार्किंग तयार करण्याचे काम देण्यात आले होते. सीटीटीव्ही कॅमेरे, पार्किंगस्थळी सेंसर, प्रवेशद्वारावर संगणकीय प्रणालीयुक्त सुविधा या पार्किंगच्या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या एसपीव्ही कंपनी हा प्रकल्प महापालिकेच्या वाहतूक विभागाकडे सुपूर्द केला.

वाहतूक विभागाने स्मार्ट पार्किंगच्या संचालनासाठी एका एजन्सीची नियुक्ती करणे अपेक्षित होते. परंतु दोन वर्षे होत असून पालिकेच्या वाहतुक विभागाने या प्रकल्पाचे बारा वाजवल्याचे चित्र आहे. आयुक्त तुकाराम मुंढे आल्यानंतर पार्किंग सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु स्मार्ट सिटीवरून सत्ताधारी व आयुक्त यांच्यातील वादाने शहरातील विकास कामे ठप्प झालीच, शिवाय एका चांगल्या प्रकल्पाचीही वाताहत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

एकीकडे महापालिकेला उत्पन्न नसल्याने विकास कामांच्या फाईल्स आयुक्तांनी रोखल्या आहेत. मात्र, त्याचवेळी महापालिकेच्या उत्पन्नात भर घालण्याची क्षमता असलेल्या प्रकल्प सुरू करण्याकडे आयुक्तांचेही दुर्लक्ष होत आहे. 

अतिक्रमणाचा धोका 
सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने स्मार्ट पार्किंगमधील अतिक्रमण गायब झाले. परंतु लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे पुन्हा दुकानदारांचे अतिक्रमण होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या आगमनापूर्वी स्मार्ट पार्किंगच्या वसुलीसाठी तयार करण्यात आलेले स्टॉल येथील चहाटपरीवाल्यांसाठी सोयीचे झाले होते. भविष्यातही अशीच स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. 

पालिकेच्या उत्पन्नालाही फटका 
स्मार्ट पार्किंगमध्ये 85 कार पार्किंगसाठी जागा निश्‍चित करण्यात आल्याचे पालिकेतील सुत्राने नमुद केले. एवढेच नव्हे दुचाकी वाहनांनाही पार्किंगसाठी स्थान देण्यात येणार आहे. येथे पार्किंगसाठी तासाप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कामुळे आर्थिक संकटातील पालिकेला दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. परंतु पार्किंग सुरू न झाल्याने उत्पन्नालाही फटका बसत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com