"स्मार्ट' असूनही करावी लागतेय "तीला' प्रतीक्षा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

2014 मध्ये राज्यात स्मार्ट पोलिस स्टेशन निर्मितीचा निर्णय तत्कालीन भाजप सरकारने घेतला. नागपूरला प्राधान्य देण्यात येऊन लकडगंज पोलिस स्टेशनची निवड करण्यात आली. 1

नागपूर : राज्यातील पहिले "स्मार्ट पोलिस स्टेशन' म्हणून ओळख असणाऱ्या लकडगंज ठाण्याची बहुमजली इमारत लोकापर्णासाठी सज्ज आहे. परंतु, श्रेय लाटण्याच्या भानगडीत अद्याप तिचे लोकार्पण झाले नसल्याची माहिती पुढे आली. आता नागपूरला गृहमंत्रिपद मिळाल्याने येत्या आठवड्यात लोकार्पण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. परंतु, नेमका मुहूर्त निघेल कधी, या प्रतीक्षेत नागपूरकर आहेत. 

 

श्रेयाच्या वादात लोकार्पण अडकले 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये राज्यात स्मार्ट पोलिस स्टेशन निर्मितीचा निर्णय तत्कालीन भाजप सरकारने घेतला. नागपूरला प्राधान्य देण्यात येऊन लकडगंज पोलिस स्टेशनची निवड करण्यात आली. 144 कोटी 96 लाख रुपयांचा निधी या स्मार्ट पोलिस स्टेशनसाठी मंजूर करण्यात आला. दोन वर्षांत 26 हजार 800 चौरस मीटर क्षेत्रफळात चार मजली स्मार्ट पोलिस स्टेशनचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनादरम्यान या पोलिस स्टेशनचे लोकार्पण होण्याची दाट शक्‍यता होती. मात्र, श्रेयाच्या वादात लोकार्पण अडकले. त्यामुळे या स्मार्ट पोलिस स्टेशनच्या इमारतीतून लकडगंजचा कारभार सुरू होऊ शकला नाही.

 

अवश्‍य वाचा- महिलांनो, न सांगता बाहेर जाऊ नका! अन्यथा पतीचा जीव येईल धोक्‍यात... 

 

येत्या आठवड्यात उद्‌घाटन होण्याची चर्चा

सर्व सुविधायुक्त पोलिस स्टेशनसह येथे पोलिस उपायुक्त व सहायक पोलिस आयुक्तांचे कार्यालयही येथे आहे. शिवाय या ठिकाणी पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज 12 मजली 4 इमारतीही बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी व्यावसायिक संकुलासह, क्‍लब व जिमही असणार आहे. लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये सौरऊर्जा प्रकल्प असून, याद्वारे 65 किलोवॉट वीजनिर्मिती होईल. मलजल प्रक्रिया केंद्रही येथे आहे. तसेच सर्वच इमारतींमध्ये अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र, भाजप सरकारच्या कार्यकाळात पोलिस स्टेशनची पायाभरणी आणि इमारतही उभी झाली. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार आले. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मार्ट पोलिस स्टेशनचे उद्‌घाटन होईल, अशी चर्चा होती. मात्र, ती फोल ठरली. आता गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांच्याकडे असल्याने येत्या आठवड्यात स्मार्ट पोलिस स्टेशनचे उद्‌घाटन होण्याची चर्चा आहे. 

 


डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्‍त

लकडगंज पोलिस स्टेशनची इमारत सज्ज आहे. लोकार्पणासंबंधी वरिष्ठांशी चर्चा करणे सुरू आहे. चर्चेअंती लोकापर्णाची तारीख ठरविण्यात येईल. लवकरच स्मार्ट पोलिस स्टेशनचा कारभार सुरू करण्यात येईल. 
-डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्‍त. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Smart" police station waiting for inauguration