मग वाडीतील रुग्णालयाचे घोडे अडले कुठे ? जनतेला पुकारावा लागला ‘एल्गार’....

विजय वानखेडे
Tuesday, 22 September 2020

दै.‘सकाळ'ने नुकतीच या बाबीची दखल घेऊन ‘वाडीचा गुदमरतोय श्‍वास, हवे जंबो रुग्णालय’ या उपक्रमांतर्गत जनहितार्थ बाबीकडे विशेष लक्ष देणे सुरू केले. तेव्हा कुठे वाडीतील सर्वपक्षीय एकत्र येऊन या बाबीला दुजोरा दिला व नुकतीच सर्वपक्षीय बैठक घेऊन वाडीत कोविड उपचार केंद्र निर्माण करण्यासाठी लागणारी साधन सामुग्रीचा निधी गोळा करण्याचा मानस व्यक्त केला.

वाडी (जि.नागपूर): नागपूर महानगर पालिकेला लागून असलेली व सर्व दृष्टीने महत्त्वपूर्ण समजली जाणारी वाडी नगरपरिषद. येथील लोकसंख्या एक लाखाच्या घरात आहे. शहरापासून जवळच असल्याने वाडीचे महत्त्व व वाढ लक्षात घेता ही नगरपरिषद ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय क्षेत्रात पूर्वीपासूनच चढाओढ असते. शहराच्या नजीकच्या नगरपरिषदेत सुसज्ज असे शंभर खाटांचे ग्रामीण रुग्णालय निर्माण होणे अपेक्षित होते. परंतू राजकीय अनास्था आणि सत्तेसाठी राजकारण या दोन कारणांमुळे आजपावेतो हे शक्य झाले नसल्याचे दिसते. आज संकटसमयी जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना वाडीत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उघड झाल्यानंतर सर्व  राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रुग्णालय व आरोग्य सेवेसाठी ‘एल्गार’ पुकारावा लागला.

अधिक वाचा: डिसेंबर अखेरपर्यंत राहणार बोर अभयारण्याचे प्रवेशद्वार लाॉकडाउनच...
 

कोविड रुग्णालयासाठी निधी गोळा करणे सुरू
दै.‘सकाळ'ने नुकतीच या बाबीची दखल घेऊन ‘वाडीचा गुदमरतोय श्‍वास, हवे जंबो रुग्णालय’ या उपक्रमांतर्गत जनहितार्थ बाबीकडे विशेष लक्ष देणे सुरू केले. तेव्हा कुठे वाडीतील सर्वपक्षीय एकत्र येऊन या बाबीला दुजोरा दिला व नुकतीच सर्वपक्षीय बैठक घेऊन वाडीत कोविड उपचार केंद्र निर्माण करण्यासाठी लागणारी साधन सामुग्रीचा निधी गोळा करण्याचा मानस व्यक्त केला. त्याची रितसर परवानगी नागपूर ग्रामीणचे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना भेटून बुधवारी पूर्ण करणार  असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर स्थापन झालेल्या कृती समितीचे नागरिकांनी शेवटी स्वागत केले.

अधिक वाचाः बाधितांच्या संख्येपुढे दम टाकताहेत जिल्ह्यातील कोविड रुग्णालये, उपचारांच्या ‘ऑक्सिजनची गरज
 

 जागा निश्चित झाली, पण...
वाडीमध्ये सरकारी दवाखाना व्हावा, यासाठी तत्कालीन खासदार मुकुल वासनिक यांच्या प्रयत्नाने नवनीत नगर येथील आयुध निर्माणीच्या शासकीय जागेवर रुग्णालयात बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने त्याला ‘हिरवा कंदील’ दिला होता. सत्ता बदलानंतर रुग्णालय स्थापनेचे घोडे कुठे अडले, हा प्रश्न निर्माण होत आहे. वाडीत रुग्णालय व्हावे यासाठी अनेकदा काँग्रेसने आंदोलने केली आहेत.

कृती समितीचा पुढील कार्यक्रम
 कोरोना उपचार केंद्र निर्मितीसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी दानदात्यांची यादी तयार झाली आहे. याची रीतसर परवानगी घेण्यासाठी कृती समिती तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना बुधवारी निवेदन देणार असल्याचे सांगितले.

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So where are the hospital horses in the village? The people had to shout 'Elgar' ....