esakal | कामठीत सैनिकाला झाली कोरोनाची बाधा; या ठिकाणाहून आला होता परत 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एकाच दिवशी दोन रुग्ण आढळल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे.  कामठी तालुक्‍यात एकूण 21 रुग्ण कोरोनाबाधित आढळले. त्यातील 12 रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले. 

कामठीत सैनिकाला झाली कोरोनाची बाधा; या ठिकाणाहून आला होता परत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

 कामठी (नागपूर) : येरखेडा ग्रामपंचायत हद्दीतील भूषणनगर परिसरात नायजेरिया रिटर्न 58 वर्षीय व्यक्ती तसेच कामठी कंटोन्मेंट हद्दीतील उंटखानाजवळील सैन्य फायरिंग रेंजमध्ये कार्यरत 32 वर्षीय सैनिक कोरोनाबाधित आढळल्याचे आज सकाळी 8 वाजता निष्पन्न झाले. एकाच दिवशी दोन रुग्ण आढळल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, भूषणनगर येथील कोरोनाबाधित रुग्ण नायजेरिया येथे कार्यरत आहे. नायजेरियाहून बेंगळुरूला येऊन कारने बुधवारी रात्री भूषणनगरला आले. सकाळी नागपूरच्या मेयो रुग्णालयात केलेल्या तपासणीत कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. माहिती कळताच तहसीलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, नायब तहसीलदार रणजित दुसावार, नगर परिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके, वैद्यकीय अधिकारी डॉ. शबनम खानुनी, आरोग्य विस्तार अधिकारी दिघाडे, माजी सरपंच मनीष कारेमोरे व आरोग्य पथकाने भूषणनगर गाठले. या रुग्णाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कातील 7 जणांना पाचपावली येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात दहा दिवसांसाठी हलविण्यात आले. 

हेही वाचा : दरोड्याच्या तयारीत होते आरोपी, पोलिसांना लागला सुगावा आणि...

कोरोनाबधित सैनिक हा काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातून विभागीय कामकाज आटोपून पाच जणांसह शासकीय वाहनाने कामठी कंटोन्मेंट परिसरात आला. या सहाही सैनिकांना विशेष खोलीत चार दिवसांपासून क्वारंटाइन करण्यात आले होते. पैकी एकाला कोरोनाची लक्षणे आढळली. कामठी मिलिटरी हॉस्पिटल येथे तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला मिलिटरी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सोबतच्या पाच सैनिकांचे घशाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांनासुद्धा मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. कामठी तालुक्‍यात एकूण 21 रुग्ण कोरोनाबाधित आढळले. त्यातील 12 रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले.