बंद ठेवण्याचे आदेश असूनही काही शाळा सुरूच, विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ...

school
school

नागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच धर्तीवर शनिवारी (ता.14) राज्य सरकारने शहरातील नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, या आदेशाला झुगारून सोमवारी (ता.16) शहरातील काही शाळा सुरू असल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, स्कूलबसमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकत्रितपणे नेण्याचे धाडसही शाळांनी दाखविले.

शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. त्यात शहरातील सर्व नागरिकांनी सहभाग देणे गरजेचे आहे. त्यातूनच 31 मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद करण्याचे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात आले.

या आवाहनाला प्रतिसाद देत, बहुतांश शाळा, महाविद्यालयांनी सोमवारपासून शाळा बंद ठेवल्या. मात्र, काही अनुदानित आणि खासगी शाळांनी मुद्दामपणे शाळा सुरू ठेवल्याचे चित्र होते. यात प्रामुख्याने रेशीमबाग येथील काही शाळा, जयताळा आणि वायुसेनानगर येथील काही शाळांचा समावेश होता. याशिवाय शहरालगतच्या शाळांही सुरू असल्याचे चित्र होते. त्यामुळे सरकारचा आदेश न मानणाऱ्या शाळांवर प्रशासनाकडून कारवाई व्हावी अशी पालकांची मागणी आहे. दरम्यान, यासंदर्भात संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. 

ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालयेही बंद 
राज्याने शहरातील नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असताना, त्यातून ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयांना वगळले होते. मात्र, सोमवारी (ता.16) राज्याच्या शालेय शिक्षण, कौशल्यविकास, उच्च शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आदेश काढून ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, कौशल्यविकास केंद्र,आयटीआय आणि प्रशिक्षण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात 1500 हून अधिक जिल्हा परिषद शाळा आहेत.

याशिवाय 100 हून अधिक महाविद्यालये आहेत. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई शाळांचाही समावेश आहे. मात्र, त्यात शिकविणारे बहुतांश शिक्षक व विद्यार्थी शहरातील असल्याने या शिक्षक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com