sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अनेकवेळा सोनू नागपुरात येत असतो. यावेळी तो त्याचे कॉलेज आणि येथील विविध ठिकाणांना आवर्जून भेट देतो. नागपूरबद्दल त्याच्या मनात एक वेगळेच स्थान आहे आणि राहील, हेसुद्धा मोठ्या मनाने तो मान्य करतो. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना

sakal_logo
By
प्रशांत रॉय

नागपूर : तो पंजाबी, ती तेलुगू. शिक्षणासाठी दोघे उपराजधानीत आले होते. पहिल्या भेटीतच मैत्री झाली. फोनाफोनी करत डेटिंग सुरू झाले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. टाइमपास न करता दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचे ठरविले. 1996 मध्ये दोघांनी रीतसर लग्नही केले. विशेष म्हणजे, त्यावेळी कोठेच काही नसलेला तो आज चित्रपटांमध्ये व्हिलनच्या रोलसाठी प्रसिद्ध आहे. काळाचा महिमा असा की, कोरोनाच्या संकटकाळात केलेल्या भरीव मदतकार्याने चित्रपटातील व्हिलन सोनू सूद रिअल लाइमध्ये मात्र खराखुरा हिरो म्हणून पुढे आला आहे. 

मूळचा पंजाब येथील सोनू सूद अभियंता होण्यासाठी नागपुरात आला. वानाडोंगरी येथील यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयात सोनूने प्रवेश घेतला. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर त्याला एमबीए करणारी सोनाली भेटली. ती तेलुगू परिवारातील. पहिल्या भेटीतच त्यांच्या तारा जुळल्या. नागपुरात धरमपेठ, सीताबर्डीत फेरफटका मारणे, सदर परिसरातील स्मृती टॉकीजमध्ये चित्रपट पाहणे, शंकरनगरातील ब्रेड पकोडा, कटिंग चहाचा आस्वाद मित्रांच्या घोळक्‍यात घेणे, अंबाझरी व फुटाळा तलावाकाठी हातात हात घेऊन सूर्यास्त पाहणे त्यांना आवडायचे. 

ही प्रेमळ साथ जीवनभर अशीच राहावी, यासाठी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि 1996 मध्ये पती-पत्नी म्हणून वैवाहिक आयुष्याला सुरवात केली. अभियंता होण्यापेक्षा सोनूला अभिनेता होण्याची इच्छा होती. सोनालीचा प्रारंभी याला विरोध होता. मात्र, तिने सोनूला त्याच्या संघर्षाच्या काळात साथ दिली. लग्नानंतर मुंबईला दाखल झाल्यावर सोनूने मॉडेलिंग केले. काही काळानंतर त्याला चित्रपट मिळू लागले. मेहनतीच्या बळावर त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्येही आपली छाप सोडली आहे. अनेकवेळा सोनू नागपुरात येत असतो. यावेळी तो त्याचे कॉलेज आणि येथील विविध ठिकाणांना आवर्जून भेट देतो. नागपूरबद्दल त्याच्या मनात एक वेगळेच स्थान आहे आणि राहील, हेसुद्धा मोठ्या मनाने तो मान्य करतो. 

सोनूवर कामगार, मजुरांचा भरोसा 
महानगरांमधून घरी परतणारे स्थलांतरित कामगार, मजूर यांना सोनू सूद, सोनाली हे फार मोठे आधार ठरले आहे. दिवसरात्र कोणतीही तमा न बाळगता या लोकांना ख्यालीखुशालीने इच्छित स्थळी पोहोचवत आहे. त्यांचे तिकीट, जेवण आदींचा खर्च तो स्वतः उचलत आहे. सोनूची दोन्ही मुलेही त्यांना या समाजकार्यात मदत करत आहेत. 

हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण

इंटरनेट सर्चमध्ये आघाडी 
कालपरवापर्यंत सेवाभावी कार्यासाठी खिलाडी अक्षय कुमारला ओळखले जायचे. परंतु, सोनू सूद यांनी रस्त्यावर उतरून 24 तास जे मदतकार्य चालवले आहे त्यावरून नेटकरींनी सोशल मीडियावर सोनूला डोक्‍यावर उचलून घेतले आहे. इंटरनेटवर सोनू सूदच्या नावाने सर्च करण्याचे प्रमाण वाढले असून, सोनूने याबाबतीत अक्षयलाही मागे टाकले आहे. 

व्हिलन झाला मसिहा 
कोरोनाच्या संकटात स्थलांतरित गरीब मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावाकडे पोचून देण्याचा सोनू प्रयत्न करत आहे. त्याच्या या सामाजिक योगदानाची दखल राज्यपालांसह उद्योजक आणि चित्रपटसृष्टीनेही घेतली आहे. त्याच्या चित्रपटातील भूमिकांमुळे कालपर्यंत द्वेष, रागाच्या नजरेने त्याच्याकडे पाहणारे आज त्याला संकटकाळातील मसिहा मानत आहेत. 

go to top