Video : टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हे आहेत जालीम उपाय, पाहा करून...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

जेवणाच्या शोधात त्या फिरत असताना, त्यांच्यावर नियंत्रण शक्‍य नाही. त्यामुळे विमान वा ड्रोन याद्वारे त्यांच्यावर रसायन फेकले तरी, त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्‍वरसह मोर्शी, वरुड तालुक्‍यात थैमान घातलेल्या टोळधाडीवर रात्रीच फवारणी केल्यास ती उपयोगी ठरणारी असल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेरिक्‍चलर ऍन्ड बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेंट रिसर्चचे (सीबीएसआर) संचालक डॉ. मनोज रॉय आणि नागपूरच्या कृषी महाविद्यालयातील किटकशास्त्र विभागाचे डॉ. राहुल वडस्कर यांनी व्यक्त केले.

डॉ. मनोज रॉय यांनी घेतलेल्या नमुन्यानुसार टोळधाड उष्ण वातावरणात अधिक प्रमाणात विकसित होत असून, हिरवळीत वाढते. सध्या नागपूरचे तापमान अतिउष्ण असल्याने या वातावरणाचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. जेवणाच्या शोधात त्या फिरत असताना, त्यांच्यावर नियंत्रण शक्‍य नाही. त्यामुळे विमान वा ड्रोन याद्वारे त्यांच्यावर रसायन फेकले तरी, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मात्र, सायंकाळी हा झुंड झाडावर वा जमिनीवर बसला असतो. त्यावेळी त्याच्यावर फवारणी करून नियंत्रण मिळविता येणे शक्‍य असल्याचे ते म्हणाले.

अस्सल खर्रा, तर्री पोह्याची चव चाखायचीय्‌ तर या मग...

नेमके किती रसायन वापरावे हे त्या क्षेत्रातील नागरिक, प्राणी, पक्षी आणि इतर गोष्टींना ध्यानात घेऊन करणे गरजेचे आहे. टोळधाड जिथे मानवी वावर नसतो, तिथेच प्रजनन करीत असल्याने अशा क्षेत्रांचा शोध घेणे आवश्‍यक आहे. याशिवाय डॉ. वडस्कर यांनीही शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपलब्ध असलेली असलेले "क्‍लोरोफायरीपॉस' हे औषध त्यावर उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.

आपल्याकडे 20 ईसी या फॉर्मेशननुसार 24 एमल हे दहा लिटर पाण्यात टाकून फवारणी केल्यास टोळधाडीचा प्रकोप कमी करण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले. याशिवाय ज्या पिकांवर आधीच फवारणी केली आहे, त्या पिकांचे अधिक नुकसान टोळधाडीकडून होताना दिसून येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

अडीच महिन्यांची सायकल

गुजरात आणि राजस्थान या राज्यात डिसेंबर महिन्यात टोळधाडीचा हल्ला दिसून आला. त्यानंतर नागपुरात मध्यप्रदेश मार्गाने दाखल झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार टोळधाडीचे जीवनमान अडीच महिन्यांच्या काळाच असते. यादरम्यान प्रजनन आणि विकसित होण्याची प्रक्रिया सुरू असते. विशेष म्हणजे ज्या किड्यांचा रंग गुलाबीपासून पिवळा होत असतो, त्या मादी समागम करण्यासाठी तयार असतात. त्यानंतर त्यांची प्रजनन प्रक्रिया सुरू होत असल्याचे डॉ. मनोज रॉय म्हणाले. उष्ण तापमानाचा त्यांचावर परिणाम होत नाही. सध्या त्याचे वास्तव्य बालाघाटच्या दिशेने असले तरी, हवेच्या दिशेने जाणारे टोळधाड जिथे हिरवळ दिसते, त्या ठिकाणी थांबून ती नष्ट करून टाकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spray at night to control locusts