वन्यजीवांचे भ्रमणमार्ग खंडीत करू नका, राज्य वनविभागाच्या सूचना

राजेश रामपूरकर
Monday, 5 October 2020

वन संरक्षण अधिनियम १९८० अंतर्गत नवीन रस्त्यांच्या बांधकामांसाठी आणि चारपदरी व सहापदरी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेक प्रस्ताव वन खात्याकडे येत आहेत. हे काम करताना मात्र, वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी काही सूचना राज्याच्या वन खात्याने दिल्या आहेत.

नागपूर : राज्याच्या वन खात्याने वन्यजीवांचा अधिवास असणाऱ्या क्षेत्रातून जाणारे रस्ते दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन रस्ते तयार करण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याकरिता एक परिपत्रक काढले आहे. वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रातून जाणारे रस्ते आणि त्यामुळे होणारे वन्यप्राण्यांचे अपघात लक्षात घेता हे पत्रक काढल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत वन्यजीवांच्या रस्ते अपघातावर चिंता व्यक्त केली होती. 

हेही वाचा - संत्र्याच्या हंगामात नागपूरहून धावणार किसान रेल, काय सांगतात रेल्वेमंत्री

वन संरक्षण अधिनियम १९८० अंतर्गत नवीन रस्त्यांच्या बांधकामांसाठी आणि चारपदरी व सहापदरी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेक प्रस्ताव वन खात्याकडे येत आहेत. हे काम करताना मात्र, वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी काही सूचना राज्याच्या वन खात्याने दिल्या आहेत. जंगलाच्या सभोवताली पायाभूत सुविधा पुरवताना वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग कमीत कमी प्रभावित व्हावेत. गरज भासल्यास वन्यजीव उपशमन योजनेबाबत माहिती देण्यासाठी तसेच आवश्यक अशा ठिकाणी सर्वेक्षण करण्यात यावे. त्याचा अहवाल आल्यानंतरच मग पुढची कारवाई व्हावी.

हेही वाचा - फोरलेन ढाब्याच्या हुक्का पार्लरवर धाड; मालकासह चौघांना अटक

संरक्षित क्षेत्राबाहेरील जंगलातून जाणाऱ्या विद्यमान रस्त्यांबाबत, व्याघप्रकल्प, वन्यजीव कॉरिडॉर आणि वन्यजीवांचा अधिवास असणारे क्षेत्र या ठिकाणाहून नवीन रस्ते तयार करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवताना उपाययोजना लक्षात घ्याव्यात. यात भुयारी मार्ग कमीत कमी चार मीटर रुंदी आणि तीन मीटर उंचीचे असावेत. अशा भुयारी मार्गादरम्यान मध्यंतर हा दोन किलोमीटरपेक्षा अधिक नसावा. त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर तसेच परिणाम आणि तथ्य नोंदवल्यावर काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये भुयारी मार्गात बदल करता येतात किंवा अभियांत्रिकी मानके आणि भूप्रदेश घटकानुसार त्यात तांत्रिक बदल करता येतात. ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक नाले, ओढे आडवे येतात त्या ठिकाणी नवीन भुयारी मार्ग तयार करण्याची गरज नाही. तसेच नैसर्गिक नाले, ओढे असणाऱ्या ठिकाणी अभियांत्रिकी आवश्यकतेनुसार त्याची पुनर्रचना करता येईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state forest department orders do not disturbed the wildlife trails