शहीद भूषण सतई यांच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत, अनिल देशमुखांची माहिती

राजेश प्रायकर
Sunday, 29 November 2020

शहीद भूषण सतई २०१० मध्ये नायक पदावर रुजू झाले होते. श्रीनगर येथील गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते. तेथे त्यांना वीरमरण आले. युद्धजन्य परिस्थितीमध्ये तसेच देशातील सर्व क्षेत्राअंतर्गत सुरक्षासंबंधी मोहिमेत शहीद झालेल्या जवानांना राज्य सरकार मदत करते.

नागपूर : पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात काटोलचे सुपुत्र भूषण रमेश सतई शहीद झाले. शहीद भूषण यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठपुरावा केला. नुकतेच राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शहीद भूषण यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रचार तोफा थंडावल्या, काउंटडाऊन सुरू

शहीद भूषण सतई २०१० मध्ये नायक पदावर रुजू झाले होते. श्रीनगर येथील गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते. तेथे त्यांना वीरमरण आले. युद्धजन्य परिस्थितीमध्ये तसेच देशातील सर्व क्षेत्राअंतर्गत सुरक्षासंबंधी मोहिमेत शहीद झालेल्या जवानांना राज्य सरकार मदत करते. शहीद भूषण सतई यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मंजूर व्हावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर शहीद भूषण यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

हेही वाचा - प्रत्येकाच्या मागे ईडी लागलीय, संपूर्ण ताकदीनिशी सामना...

देशासाठी प्राणाची आहुती देत शहीद भूषण सतई यांनी आई-वडिलांसोबतच काटोल व जिल्ह्याची मान उंचावली. शहीद भूषण यांच्या कुटुंबीयांना कितीही मदत दिली तरी त्यांच्या कुटुंबावर जे दुःख आले आहे ते कमी होणार नाही. परंतु, शहीद भूषण यांनी देशासाठी जे बलिदान दिले त्याचा सन्मान व्हावा यासाठी ही मदत कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government gave 1 crore help to martyr bhushan satai family in katol of nagpur