कस्तूरचंद पार्कवरील शंभर वर्षे जुन्या पुतळ्याचे नुकसान...  वाचा या स्मारकाविषयी

kastuchand daga
kastuchand daga

नागपूर : धनिक, दानशूर व्यक्ती, बँकर, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ व दूरदृष्टी दृष्टीकोण असलेले सेठ कस्तूरचंद डागा हे नेहमीच नागपूरकरांचे प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. त्यांच्या कर्तृत्वापासून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने कस्तूरचंद पार्कवर जवळपास शंभर वर्षांपूर्वी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. मात्र शनिवारी रात्री आलेल्या वादळाने या ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पुतळ्याचे दुर्दैवाने नुकसान केले.

नागपुरातील उद्योगविश्वाला आणि सहकारक्षेत्राला खऱ्या अर्थाने चालना देणाऱ्या कस्तुरचंद डागा यांचा नागपूर शहराच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. डागा यांची ख्याती त्या काळात नागपूरपासून रंगूनपर्यंत आणि कराचीपासून ढाक्यापर्यंत पसरली होती. इलेक्ट्रिसिटी व टेलिफोन नेटवर्क नसतानाही त्यांनी टेक्सटाईल मिल्स, खाण, रुग्णालयांसह आधुनिक शिक्षण संस्था यशस्वीरीत्या चालवून मोठे साम्राज्य उभे केले. या माध्यमातून त्यांनी भरपूर पैसा तर कमावलाच, शिवाय कोट्यावधी रुपये खर्च करून समाजसेवाही केली. त्या काळात एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती.

मूळ राजस्थानचे असलेले पण नागपुरात स्थायिक झालेले सेठ कस्तूरचंद डागा यांनी त्या काळात शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक कस्तूरचंद पार्कवरील मैदानाची जागा दान दिली होती. त्यामुळेच हे मैदान त्यांच्या नावाने आजही ओळखले जाते.  याशिवाय शहरातील मॉडेल मिल तसेच हिंगणघाटची डागा मिल हीदेखील 62 वर्षीय कस्तूरचंद डागा यांचीच देण होय. त्यांनी आपले योगदान केवळ नागपूर व विदर्भातच दिले नाही, तेव्हाच्या अखंड भारतातील व सध्या पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीतही मोठी जमीन दान देऊन आपल्या उदारतेचा परिचय दिला. त्यामुळे नागपूरसह रावळपिंडी येथेही डागा यांच्या नावाने पार्क उभारण्यात आले आहे.

सेठ कस्तूरचंद डागा यांचे 20 जानेवारी 1917 रोजी वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कस्तूरचंद पार्कला त्यांचे नाव देण्यात आले. शिवाय या ठिकाणी डागा यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. मुंबईचे प्रसिद्ध कलावंत सी. के. मात्रे यांनी हा पुतळा साकारला होता. तसेच तत्कालीन गव्हर्नर फ्रॅन्क स्लाय यांच्या हस्ते हजारोंच्या उपस्थितीत डिसेंबर 1924 मध्ये पुतळ्याचे अनावरण झाले होते. डागा यांची स्मृती असलेल्या कस्तूरचंद पार्कवर आतापर्यंत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसह अनेक राजकीय नेत्यांच्या सभा झाल्यात. असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडलेत. मोठमोठे उद्योग प्रदर्शन भरले.

- 'तो' बरा होण्याची वाट पाहू अन्‌ आम्ही तिघेही सोबत घरी जाऊ, त्यांनी केला संकल्प...

ब्रिटिश काळातही येथे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शने भरल्याची माहिती आहे. या ऐतिहासिक वास्तूची आज मात्र दुर्दशा झाली आहे. डागा यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने कस्तूरचंद डागा यांना 'नाइटहूड' प्रदान करून दिवाण बहादूर सर कस्तूरचंद डागा या उपाधीने सन्मानित केले. नागपूरला औद्योगिक शहर म्हणून ओळख देणारे सर डागा यांचे योगदान नागपूरकर कधीही विसरू शकणार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com