हाफकिनकडून होणारी रुग्णालयीन खरेदी बंद करा; विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटनेची मागणी 

Stop buying medical products from haffkine seeking medical community
Stop buying medical products from haffkine seeking medical community

नागपूर ः शासनाने सर्व शासकीय रुग्णालयांतील औषध व सर्जिकल साहित्याची खरेदी हाफकिनकडून करणे सुरू करून वर्ष झाल्यावरही अद्याप खरेदी प्रक्रिया सुरळीत झाली नाही. त्यामुळे सर्वत्र गरीब रुग्णांना सर्व औषधांसह साहित्य मिळत नाही. दुसरीकडे, जास्त पुरवठा झाल्यास अनेक वस्तू खराब होतात. त्यामुळे हाफकिनची खरेदी बंद करा, अशी मागणी विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेने (इंटक) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

शासनाने हाफकिनकडून खरेदीचे आदेश काढले असल्याने सर्व रुग्णालये औषधे, रसायने, विविध चाचणी किट्स, सर्जिकल साहित्य, यंत्रासह सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी हाफकिनकडे मागणी नोंदविली. परंतु, सहाशेच्या जवळपास वस्तूंपैकी आतापर्यंत केवळ दीडशे ते दोनशे वस्तूंचाच पुरवठा सुरळीत झाला आहे. 

इतर वस्तूंचा पुरवठा होत नसल्याने येथील गरीब रुग्णांना त्या रुग्णालयात मिळत नाहीत. काही प्रमाणात त्या स्थानिक खरेदीतून रुग्णांना देऊन रुग्णालय प्रशासन मलमपट्टी करताना दिसते. दुसरीकडे, बऱ्याचदा हाफकिन अचानक मोठ्या प्रमाणावर साठा रुग्णालयांत पाठवून देतो. 

या रुग्णालयांत मोठे फ्रीजसह इतर साठा ठेवण्यासाठी आवश्यक संग्रहनगृह नाही. त्यामुळे अनेक वस्तू शीतगृहात ठेवता येत नसल्याने त्या बाहेर राहून खराबही होतात. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्ययही होतो. हा सर्व घोळ हाफकिनकडून होत असताना त्यात स्थानिक शासकीय रुग्णालये बदनाम होतात. फडणवीस सरकारच्या काळातील ही हाफकिनची खरेदी प्रक्रिया बंद करून पुन्हा स्थानिक स्तरावर खरेदी केल्यास आवश्यक असलेल्याच वस्तू खरेदी करून रुग्णांना ती वेळेत मिळण्यासह अनावश्यक वस्तूंची खरेदी न होऊन शासनाचा निधी वाचेल, असे संघटनेतर्फे पत्रकातून कळविले. 

मागील चार वर्षांपासून अनेक रुग्णालयांचा निधी हाफकिनच्या तिजोरीत पडून आले. यंत्र खरेदीपासून तर औषध खरेदीत हाफकिन अपयशी ठरली आहे. यामुळे शासनाकडून सर्व रुग्णालयांना दरपत्रक ठरवून द्यावे. यामुळे जास्त दरात वस्तू कुणालाही खरेदी करता येणार नाही. संभाव्य गैरव्यवहार होणार नाही. 
- त्रिशरण सहारे, 
अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी संघटना, नागपूर.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com