अरे हे काय, परीक्षा दिली तरीही निकालात अनुपस्थित !

students are absent from the results even they have taken the exam
students are absent from the results even they have taken the exam

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेच्या निकालातील आणखी एक गोंधळ समोर आला आहे. बीएसस्सीच्या एका विद्यार्थ्याने ऑनलाईन परीक्षा दिली. यानंतर पेपर जमा झाल्याचा संदेशही त्याला प्राप्त झाला. मात्र, निकालामध्ये त्याला अनुपस्थित दाखवण्यात आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आर्किटेक्चर अभ्यासक्रमात सदोष गुणपत्रिका मिळाल्याची बाब समोर आली होती.

ऑनलाइन परीक्षेदरम्यान झालेले घोळ निस्तारत विद्यापीठाने परीक्षा पार पाडली. आता निकालामध्ये या घोळाचे परिणाम आता निकालात दिसून येत आहे. एकीकडे ऑनलाइन परीक्षेने निकालात विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरघोस वाढ झाली. मात्र, त्यातील तांत्रिक दोषांमुळे अनेक विद्यार्थी बळी पडल्याच्या तक्रारी आहेत. ऑनलाइन परीक्षा या अंतिम वर्षाच्या असल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्गातील प्रवेश आणि नोकरीमध्ये यामुळे अडचणी निर्माण होणार आहे. 

दुसरीकडे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये रोज नवनवीन तांत्रिक गोंधळ असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही त्यांच्या उत्तरपत्रिका जमा झालेल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून ती महाविद्यालयाला पाठवली. शिवाय या यादीमध्ये नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षाही घेण्यात आली. 

मात्र, या यादीत नाव नसणे म्हणजे संबंधित विद्यार्थ्याने परीक्षा दिली असा होतो. असे असतानाही विद्यापीठाने त्याला अनुपस्थित दाखवल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवल्याच्या यादीत असल्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळण्यासाठी उशीर होत असल्याच्या तक्रारी आहेत.

असा आहे तांत्रिक घोळ

बीएसस्सी अंतिम वर्षाच्या शुभम क्षीरसागर या माजी विद्यार्थ्यांचे दोन विषयाचे पेपर होते. विद्यार्थ्याच्या सांगण्यानुसार त्याने दोन्ही विषयांची परीक्षा दिली असून त्या पेपर जमा झाल्याचा अंतिम संदेशही आला. त्याचे स्क्रीन शॉटही त्याच्याकडे आहेत. याशिवाय विद्यापीठाने अनुपस्थित विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली असता त्यात शुभमचे नाव नव्हते. त्यामुळे त्याने पुन्हा परीक्षा देण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु, नुकत्याच जाहीर झालेल्या बीएसस्सीच्या निकालात त्याला दोन्ही विषयात अनुपस्थित दाखवण्यात आले. विद्यापीठाच्या या गोंधळामुळे शुभमने परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी महाविद्यालयाला दोषी ठरवले. काही अधिकाऱ्यांनी परीक्षा संचालकांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. 

संपादन : अतुल मांगे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com