धक्‍कादायक... "पीपीई किट'विनाच विद्यार्थी शिरला विलगीकरण केंद्रात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

एप्रिल महिन्यांपासून या वसतिगृहामध्ये शहराच्या विविध भागातील संशयित रुग्ण ठेवण्यात आले आहेत. यातील अनेकांचे तपासणी अहवालही सकारात्मक आल्याने हे अतिजोखीम केंद्र आहे.

नागपूर : कोरोना संसर्गाचे अतिजोखीम क्षेत्र असलेल्या नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज वसतिगृहाच्या विलगीकरण केंद्रातून काही विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य व कागदपत्रे नेण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, हे साहित्य नेताना दोनपैकी एक विद्यार्थी पीपीई किटचा वापरच न करताच विलगीकरण केंद्रात शिरल्याने त्याला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या प्रकाराने एकीकडे विद्यापीठावर टीकेची झोड उठली असून, दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे समजते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यात शहरातील सर्व वसतिगृहे रिकामे करीत विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज येथील वसतिगृहाला कोरोनाचे विलगीकरण केंद्र करण्यात आले. यावेळी वसतिगहातील अधीक्षकांच्या निरीक्षणात विद्यार्थ्यांचे कागदपत्रे आणि साहित्य एका खोलीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. एप्रिल महिन्यांपासून या वसतिगृहामध्ये शहराच्या विविध भागातील संशयित रुग्ण ठेवण्यात आले आहेत. यातील अनेकांचे तपासणी अहवालही सकारात्मक आल्याने हे अतिजोखीम केंद्र आहे.

नागपूर पोलिस प्रीती दासला घालताहेत पाठीशी?, अजूनही फरार

असे असताना काही दिवसांपासून विद्यापीठाचे काही विधीसभा सदस्य आणि मानव अधिकार संघटनेच्या वतीने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांचे साहित्य देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेचे उपायुक्त राम जोशी यांनी तीन विद्यार्थ्यांना त्यांचे कागदपत्रे देण्याची परवानगी दिली. त्यानुसार कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी वसतिगृह अधीक्षक डॉ. श्‍याम कोरेती यांना विद्यार्थ्यांचे साहित्य देण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधीक्षकांनी कारवाई केली.

मात्र, यावेळी विलगीकरण केंद्रातील अधिकाऱ्यांकडे सुरक्षा संचाची कमतरता असल्याने केवळ एकाच विद्यार्थ्याला संच देण्यात आला. त्याच्या सहकाऱ्याने विनासंचाने वसतिगृहात प्रवेश करत कोरोनाचा धोका ओढवून घेतला. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून, कोरोना संसर्गाचा धोका वाढत असताना झालेल्या या प्रकारामुळे विद्यापीठावर टीका होत आहे.

दरम्यान, याबाबत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे आणि सिनेट सदस्य ऍड. मनमोहन वाजपेयी यांनी टीका करीत विद्यार्थ्यांना विलगीकरण केंद्रात प्रवेशाची परवानगी देण्याबाबत आक्षेप घेत, तसेच विद्यापीठाच्या कर्मचाऱ्याला पाठविण्याऐवजी विद्यार्थ्याला पाठवून त्याचा जीव धोक्‍यात टाकल्याबाबत विद्यापीठाला जबाबदार धरले आहे.

 

लक्षणे दिसल्यास निश्‍चित तपासणी
विद्यार्थी कागदपत्रांसाठी आले होते. त्यांना नोकरीसाठी तत्काळ कागदपत्रे हवी होती. त्यामुळे त्यांना आपल्याजवळील पीपीई किट देऊन जाण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे त्यांच्याकडे मुबलक सुरक्षेचे साहित्य उपलब्ध नव्हते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. विद्यार्थी कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले नसल्याने तपासणी करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. तशी लक्षणे दिसल्यास त्यांची निश्‍चित तपासणी होईल.
राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students enter Separation Center without PPE kit in Nagpur