नागपुरच्या महिलेने मिळविला आगळा-वेगळा सन्मान, असा बहुमान मिळविणारी पहिलीच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) भारतात महिला टेनिस पंचांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नागपूरच्या आंतरराष्ट्रीय टेनिस पंच सुप्रिया चॅटर्जी यांची महिला ऍम्बेसिडर म्हणून नियुक्‍ती केली आहे.

नागपूर : काही दिवसापूर्वी राष्ट्रीय बास्केटबॉलपटू असलेल्या अंतरा मेहताने महाराष्ट्रातील पहिली महिला फायटर पायलट होण्याचा मान मिळविला. यामुळे नागपूरला मानाचे स्थान मिळाले होते. आता आणखी एका महिलेमुळे नागपूरकरांची मान गर्वाने उंचावली आहे.

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) भारतात महिला टेनिस पंचांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नागपूरच्या आंतरराष्ट्रीय टेनिस पंच सुप्रिया चॅटर्जी यांची महिला ऍम्बेसिडर म्हणून नियुक्‍ती केली आहे. असा बहुमान मिळविणाऱ्या त्या नागपूरच्या पहिल्या महिला टेनिस पंच ठरल्या आहेत. आयटीएफने महिला टेनिस पंचांना पुढे आणण्यासाठी गतवर्षी "ऍडव्हांटेज ऑल' ही संकल्पना सुरू केली होती. आयटीएफ महिला टेनिसअंतर्गत चीनच्या टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने शेनझेन (चीन) येथे आयोजित आशिया ओशनिया एडिशनमध्ये आयटीएफच्या सर्व महिला टेनिस पंचांनी पंचगिरी केली होती. शिवाय प्रशिक्षण व एकमेकांशी संवाद साधणाऱ्या कार्यशाळेतही सहभाग नोंदविला.

वाचा - आयुक्त तुकाराम मुंढेंना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

भारताकडून शीतल अय्यर पंच म्हणून, तर सुप्रिया या व्हाईट बॅज अंपायर म्हणून सहभागी झाल्या होत्या. कार्यशाळेनंतर आयटीएफने आशियासाठी महिला ऍम्बेसिडर्सची नियुक्‍ती केली. यात सुप्रिया यांचाही समावेश आहे. नियुक्‍ती करण्यात आलेल्या महिला ऍम्बेसिडर्स विविध देशांमध्ये महिला टेनिस पंचांची संकल्पना राबविणार आहेत. अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने वरील भूमिकेसाठी सुप्रिया यांच्या नावाची शिफारस केली होती, हे उल्लेखनीय. आयटीएफने दिलेल्या या जबाबदारीबद्दल सुप्रिया यांनी आनंद व्यक्‍त केला असून, या माध्यमातून भविष्यात अनेक नव्या महिला टेनिस पंच उदयास येतील, अशी आशा व्यक्‍त केली.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Chatterjee has been appointed as female National Ambassador of Tennis