तब्बल सात वर्षांनंतर गावकऱ्यांची भागली तहान; नळ योजनेसाठी ग्रामपंचायत कमिटीच्या प्रयत्नांना यश

Tap water scheme reached this village after seven years
Tap water scheme reached this village after seven years

लाखांदूर (जि. भंडारा) : मुरमाडी येथे लाखोंचा खर्च करून पाणीपुरवठा योजनेचे काम केले. परंतु, पाण्याचे स्रोत बंद पडल्यामुळे सात वर्षांपासून नळाला पाणी येत नव्हते. आता ग्रामपंचायत कमिटीच्या जोरदार प्रयत्नामुळे ही योजना नव्याने कार्यान्वित झाली असून, गावकऱ्यांना घरोघरी पिण्याचे पाणी मिळू लागले आहे.

जिल्हा परिषदेने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतून 2013-14 मध्ये मुरमाडी येथे 40 लाख रुपये खर्चातून नळ योजनेचे बांधकाम केले होते. मात्र, फक्त आठ दिवसांच्या तपासणीतच पाण्याचे स्रोत पूर्णतः बंद पडले. यामुळे गावात पुन्हा पाण्याची टंचाई निर्माण झाली. पाणीटंचाईचा सामना करत ग्रामस्थ त्रस्त झाले होते. तेव्हापासून ही योजना पांढरा हत्ती ठरली होती. विद्यमान ग्रामपंचायत कमेटीने पुढाकार घेऊन नव्याने बोअरवेल करून नळ योजनेचे दुरुस्ती केली. आता नळ योजनेतून निरंतर पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे गावकरी सुखावले आहेत.

तालुक्‍यातील मुरमाडी हे गाव 1600 लोकवस्तीचे गाव असून पिण्याचे पाण्याचे स्रोत म्हणून दोन हातपंप होते. त्यामुळे गावात नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. 2012 -13 मध्ये नळ योजनेसह 45 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. हे काम पूर्ण करून नळ योजनेची पाइपलाइन टाकण्यात आली होती.

तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीने बांधकाम एजन्सीचे काम पूर्ण करून तपासणी देखील केली होती. आठ दिवस सदर योजनेतून गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर योजनेचे पाणीपुरवठा करणारे स्रोत निकामी झाल्याने ही योजना ठप्प पडली होती.

2018-19 मध्ये बंद पडलेल्या योजनेचा सरपंच स्वर्णलता सोनटक्‍के, उपसरपंच लांजेवार, ग्रामसेवक हेडाऊ, व ग्रामपंचायत सदस्य यांनी पंचायत समितीची व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ विशेष दुरुस्तीचे काम मंजूर केले.

यातून ग्रामपंचायतीने काम त्वरित पूर्ण करून घेतले. त्यामुळे बहुप्रतीक्षेनंतर नळ योजनेचे पाणी ग्रामस्थांना मिळाले. सध्या गावांमध्ये 85 नळजोडण्या असून दोन वेळा पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शर्मा, वैज्ञानिक विशाल मंत्री, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळे ग्रामपंचायतीने गावातील पाणीटंचाईवर मात केली आहे.


संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com