दुकानाचे भाडे अन्‌ घरभाडे, सांगा मंत्रीमहोदय भरपाई करायची कशी ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

त्रस्त नाभिक समाज बांधव व कारागिरांनी सलून सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन दिलीत. तरीही सरकारने दूर्लक्ष केले. अखेर महाराष्ट्र नाभिक महामंडळाला "माझी दुकान-माझी मागणी' या शिर्षकाखाली मूक प्रदर्शन करावे लागले. त्यानंतर महाराष्ट्रासह नागपुरात सतीश तलवारकर, अमोल तळखंडे व प्रवीण चौधरी त्यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण करण्यात आले.

नागपूर : रविवारपासून केवळ केस कापण्यासाठी सलून सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली मात्र केवळ केस कापल्याने चार महिन्याची भरपाई भरून निघेल का ? असा प्रश्‍न सुलून चालक व मालकांपुढे निर्माण झाला आहे. आर्थिक अडचणीमुळे टाळेबंदीच्या काळात आठ कुशल सलून कारागीरांनी स्वत:चे जीवन संपविले आहे. अशात केवळ केस कापून आर्थिक संकट कसे टाळायचे हा प्रश्‍न सलून चालकांनी विचारला आहे. 

महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे केसकर्तनालय सलून चालक व कारागीरांच्या सभेत यासह अनेक समस्यांवर मंथन करण्यात आले. जिल्ह्याचे अध्यक्ष सतीश तलवारकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. तर ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय वाटकर, प्रदेश संघटक रमेश चौधरी, नागपूर जिल्हा महिलाध्यक्ष मनीषा पापडकर, उपाध्यक्ष तानाजी कडवे आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी जीवन संपविलेल्या कारागीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

वाचा : हिमतीची दाद... मणक्‍यात घुसला होता चाकू अन्‌ युवक होता मोबाईलमध्ये गुंग

त्रस्त नाभिक समाज बांधव व कारागिरांनी सलून सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन दिलीत. तरीही सरकारने दूर्लक्ष केले. अखेर महाराष्ट्र नाभिक महामंडळाला "माझी दुकान-माझी मागणी' या शिर्षकाखाली मूक प्रदर्शन करावे लागले. त्यानंतर महाराष्ट्रासह नागपुरात सतीश तलवारकर, अमोल तळखंडे व प्रवीण चौधरी त्यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण करण्यात आले.

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे टाळेबंदीने आठ सलून कारागीरांचे बळी घेतले आहेत. त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर करा, मुलांना शिक्षणात सवलती व वारसांना सरकारी नोकरी द्या अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. घर भाडे, दुकान भाडे माफ करून सरकारी सवलतीच्या दरात पीपीई कीट देण्याचा ठराव देखील यावेळी मंजूर करण्यात आला. हा ठराव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. 
सतीश तलवारकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ  

महाराष्ट्र सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन 28 जूनला सलून सुरू करण्याची घोषणा केली. मात्र आता आर्थिक पॅकेज जाहीर न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर यांनी स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tell me, Minister, how to pay? Shop rent and house rent