देणा-याचे हात हजारो, टोलनाक्यावर ते भागवताहेत दररोज हजारो मजुरांची भूक

They provide food to thousands of labours daily
They provide food to thousands of labours daily

नागपूर : गावात भुकेचा प्रश्‍न सुटत नसल्याने केवळ दोन वेळच्या जेवणाचे स्वप्न घेऊन मोठ्या शहराकडे धाव घेतलेल्या मजुरांवर लॉकडाउनमुळे महिनाभर मिळेल ते खाण्याची वेळ आली. घरापासून हजारो किमी दूर राहणारे मजूर स्वगृही परत जात असून प्रामुख्याने तेलंगणामधून आलेल्यांचा समावेश अधिक आहे. "महिने बाद नागपूरमे पेटभर खाना मिला', असे नमूद करीत या मजुरांनी महिनाभरातील दयनीय स्थितीचाच उलगडा केला. "गाव मे नागपूर की याद आयेगी', अशी पुस्ती जोडत या मजुरांनी गावाकडील भुकेच्या प्रश्‍नावरील उत्तर शोधत आगेकूच केली. 


तेलंगणा, आंध्र प्रदेश येथून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशात जाणाऱ्या मजुरांचा तांडा मिळेल त्या वाहनाने किंवा पायपीट करीत नागपुरात पोहोचला. खापरी ते भंडारा मार्ग या आउटर रिंग रोडवरील टोल नाक्‍यावर पुढे जाण्यासाठी वाहन मिळेल, या विश्‍वासाने त्यांनी गर्दी केली. गेल्या महिनाभरापासून तोकड्या पैशामुळे कधी बिस्कीट, ब्रेड आदी खाऊन भुकेशी संघर्ष करीत असलेल्या या मजुरांना टोल नाक्‍यावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोटभर खाऊ घातले. तेलंगणा येथून उत्तर प्रदेशातील गोरखपूरकडे जात असलेल्या विजय गुप्ता या तरुणाचे तोंडून आपसूकच "महिनेबाद नागपूरमे पेटभर खाना मिला', असे उद्‌गार बाहेर पडले. दोन दिवसांपूर्वी हा तरुण तेलंगणा सोडून गोरखपूरकडे निघाला. 
तेलंगणा सरकारने रेल्वे पास दिला. गेल्या महिनाभरापासून रेल्वेची प्रतीक्षा केली. परंतु, काहीच फायदा न झाल्याने मिळेल त्या वाहनाने नागपूरपर्यंत आलो, असे त्याने सांगितले. विशेष म्हणजे जेवण तयार करणाऱ्या ओरिएंटल कंपनीच्या अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत त्याने पुढील प्रवास सुरू केला. या तरुणाप्रमाणेच दररोज पाच हजार नागरिक येथे जेवण करीत असून कुठलाही त्रागा न करता ओरिएंटल कंपनीचे महाव्यवस्थापक प्रशांत वर्गी यांच्यासह अधिकारी विनोद पाठक, अशपाक खान, सिद्धार्थ नंदेश्‍वर, सुभाष चवडे, रवी वाडेकर व त्यांची टिम जोमाने मजुरांची भूक शमविण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यात आता विविध सामाजिक संस्थांनीही हातभार लावला. एवढेच नव्हे तर येथे येणाऱ्या मजुरांच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी जवळच असलेल्या शुअरटेक हॉस्पिटलच्या डॉ. ऊर्मिला, खापरी येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमधील डॉ. गौतम मदत करीत आहेत. या सर्वांमुळे स्थलांतरित मजुरांना काही क्षण का होईना जेवणाचा खरा आनंद मिळाला. 

दोन लाख मजुरांची शमविली भूख 

गेल्या 25 मार्चपासून या टोल नाक्‍यावर येणाऱ्या मजुरांना जेवण देण्यात येत आहे. तहान व भुकेने व्याकूळ झालेल्या या मजुरांना 24 तास जेवण देण्यासाठी अनेकजण झटत आहे त. आतापर्यंत दोन लाख मजुरांना भोजनदान करण्यात आल्याचे विनोद पाठक यांनी नमूद केले. 


लहान मुलांना दूध, बिस्कीट 

डोक्‍यावर सामानाचे ओझे अन्‌ कडेवर चिमुकले मुल, दुधासाठी रडणारी मुले अन्‌ लाचार आई, असेही मन हेलावून टाकणारे दृश्‍य क्षणाक्षणाला दिसते. या चिमुकल्यांची गरज लक्षात घेता त्यांना दूध, बिस्कीट आदी दिले जात आहे. भुकेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य समाधान देत असल्याचे पाठक म्हणाले. 

दरररोज पाचशे किलो धान्य 

सुरुवातीला दररोज साडेतीन हजार मजूर येत होते. आता हा आकडा कधी-कधी दहा हजारांवर जात आहे. या सर्वांच्या जेवणासाठी दररोज पाचशे टन धान्य लागत असून 20 हजार लिटर पाण्याचा वापर होत आहे. आमच्याकडील विहिर आटली असून टँकरने पाणी मागविण्यात येत असल्याचेही पाठक यांनी नमूद केले. 

महिलांना आवश्‍यक साहित्य 

येणाऱ्या महिलांमध्ये काही गरोदर स्त्रियांचाही समावेश असतो. त्यांच्या गरजेनुसार त्यांना खाद्य पदार्थासोबत औषध व इतरही साहित्य पुरविण्यात येत आहे. सॅनिटरी नॅपकिन आदीही दिले जात आहेत. गरज पडल्यास शुअरटेक हॉस्पिटलचे पथक महिलांची तसेच मुलांच्या आरोग्याचीही तपासणी करीत आहे. 

भुकेमुळे मागे पडली माणुसकी ! 

तेलंगणावरून मजुरांनी भरलेली बस आली. या बसमधील एकाचा नागपुरात येण्याच्या दोन तासांपूर्वीच मृत्यू झाला. परंतु, मृत्यू झालेल्या व्यक्तीबाबत सांगितले तर भूख आणखी ताणली जाईल, या भीतीने बसमधील भुकेने व्याकूळ झालेल्या मजुरांनी आधी जेवण केले. त्यानंतर त्यांनी बसमधील व्यक्ती कदाचित मृत झाला, असे सांगितले. दोन तास मृतदेहासोबत प्रवास केल्यानंतरही केवळ भुकेमुळे ते लपविण्याची वेळ मजुरांवर आली, अशी माहितीही पाठक यांनी दिली. या व्यक्तीसाठी डॉक्‍टर बोलावले. त्यांनी तो मृत झाल्याचे सांगितले अन्‌ बसमधूनच मृतदेह मेडिकलला पाठविण्यात आला. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेने भुकेने माणुसकीवर मात केल्याचे दिसून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com