नागपूरचे महापौर म्हणाले, नागरिकांना संधी द्यावी. त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर मग...

Think of a lockdown a hundred times ः Mayor Joshi
Think of a lockdown a hundred times ः Mayor Joshi

नागपूर : शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब आहे. मात्र लॉकडाऊन हा त्यावर पर्याय असू शकत नाही. लॉकडाऊन सामान्य नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडणारा ठरेल.

त्यामुळे लॉकडाऊन घोषित करताना शंभर वेळा विचार करावा, असे महापौर संदीप जोशी यांनी आज नमुद केले. जीवनशैलीत बदल करण्यासाठी नागरिकांना 31 जुलैपर्यंत संधी द्यावी, त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर 1 ऑगस्टपासून लॉकडाऊनचा विचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

लॉकडाऊनबाबत आयुक्तांच्या वारंवार वक्तव्यावर महापौर जोशी यांनी आज व्हिडिओ प्रसारित करून आयुक्तांनी कर्फ्यू लावताना शंभरवेळा विचार करावा, असे म्हटले. शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे, हे वास्तव आहे. यातील 30 टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

तीन वेळा लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे लॉकडाऊन केले किंवा कर्फ्यु लावल्याने रुग्णसंख्या कमी होईल, हे 100 टक्के खरे नाही. कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन उपाय नाही. दुर्दैवाने ही संख्या वाढत असेल तर तुम्ही, आम्ही, व्यापारी आणि सर्वांनाच एकत्रितपणे, संघटितपणे कार्य करणे गरजेचे आहे.

शहरात नियमाची कडेकोट अंमलबजावणी करण्याची गरज आहे. शारीरिक अंतर, मास्कबाबतचे नियम पाळले तर लॉकडाऊनची गरज पडणार नाही. मध्यमवर्गीय, ठेलेवाले, मजूर यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पुन्हा लॉकडाऊन झाले तर आत्महत्येची वेळ येईल, असेही संदेश काही लोकांनी पाठविले आहेत.

जनजागृती करूया

त्यामुळे आजपासून 31 तारखेपर्यंत आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधिंसोबत रस्त्यावर उतरून जनजागृती करूया, त्यानंतरही स्थिती आटोक्‍यात आली नाही तर लॉकडाऊनचा विचार करू, असे जोशी यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन लावणे दोन मिनिटांचे काम आहे. मात्र त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती भयंकर असेल. ही परिस्थिती टाळण्यासाठी सहकार्य करा. एकत्रित आणि संघटितपणे कोरोनाविरुद्धचा लढा द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

(संपादन : प्रशांत राॅय़ )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com