गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी पुन्हा धमकीचे फोन; दाऊदचा राईट हॅन्ड बोलतो म्हणून दिली धमकी 

अथर्व महांकाळ 
Wednesday, 9 September 2020

मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा धमकीचा फोन आला. इतकंच नाही तर गृहमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकालाही धमकीचे फोन आले.

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. अभिनेत्री कंगना राणावत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. मात्र अशातच आता महाराष्ट्रातील मंत्र्यांना धमकीचे फोन येऊ लागले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांनाही धमकीचे फोन आले आहेत. 

मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा धमकीचा फोन आला. इतकंच नाही तर गृहमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकालाही धमकीचे फोन आले.  धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख दाऊद इब्राहिमचा राईट हॅन्ड म्हणून सांगितली आहे. " कंगना राणावतच्या प्रकरणात लक्ष घालू नका अन्यथा उडवून देऊ" अशी धमकी त्याने दिली आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी! ४ दिवसांपासून शवागारात पडून होता वडिलांचा मृतदेह; पोटच्या पोराने मोबाईल केला बंद.. अखेर...  

या प्रकरणाची तक्रार पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे करण्यात आली. गृहमंत्र्यांना धमकीचा फोन आल्यामुळे पोलिस  विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या फोनबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आलेला धमकीचा फोन हा दिल्लीतून  प्राथमिक माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्याचे नाव सूरजकुमार आहे अशी माहिती मिळतेय. त्या व्यक्तीचा फोन नंबर आणि ठिकाण यावरून पोलीस हायटेक यंत्रणेचा वापर करून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatening calls at home minister Anil Deshmukh house