समाजाचे तीन आधारस्तंभ हरवले - डॉ. कुमुद पावडे

स्वाती हुद्दार
Friday, 25 September 2020

सध्या संपूर्ण जगच जीवघेण्या संकटातून जाते आहे. जणू काही सगळीकडे मृत्यूचे तांडवनृत्य सुरू आहे. या अलिकडच्या काळात अनेकांनी आप्तस्वकीयांना गमावले आहे. आणि आप्तस्वकीयांना गमावण्याचे दु:ख कधीच भरून येत नाही.

नागपूर : मौत तू एक कविता है
             मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको
ही आनंद सिनेमातली मृत्यूचे तत्वज्ञान सांगणारी अप्रतीम कविता आहे. अशा मृत्युविषयीचे तत्वज्ञान सांगणाऱ्या अनेक कविता लिहिल्या गेल्या. त्या ऐकायला नक्कीच छान वाटतात. मात्र हा मृत्यू जेव्हा आप्तेष्टांना आपल्यापासून दूर नेतो, तेव्हा ते तत्वज्ञान वगैरे आकळण्यापलिकडे असते. मन केवळ असहनीय दु:खाने व्यापलेले असते.

सध्या संपूर्ण जगच जीवघेण्या संकटातून जाते आहे. जणू काही सगळीकडे मृत्यूचे तांडवनृत्य सुरू आहे. या अलिकडच्या काळात अनेकांनी आप्तस्वकीयांना गमावले आहे. आणि आप्तस्वकीयांना गमावण्याचे दु:ख कधीच भरून येत नाही.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ साहित्यिक आणि संस्कृत पंडिता असलेल्या डॉ. कुमुद पावडे यांनाही या काळात तीन जिवलगांच्या चिरवियोगाला सामोरे जावे लागले आहे. साधारण समवयीन असलेल्या या तीन आप्तेष्टांच्या मृत्युने सैरभैर झालेल्या कुमुदताईंनी या तिघांनाही भावपूर्ण शब्दसुमनांजली अर्पण केली आहे.

कुमुद पावडेंचे हे तिन्ही आप्तेष्ट म्हणजे आपआपल्या क्षेत्रातील सुपरिचित व्यक्तिमत्त्व होती. थोर आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. भाऊ लोखंडे, पाली भाषेच्या गाढ्या अभ्यासक प्रा. डॉ. सुशीला मूलजाधव आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवेचा मानदंड असलेले डॉ. नाना मेश्राम. या तिघांच्या जाण्याने कुमुद ताईंचे वैयक्तिक नुकसान तर झालेच आहे, त्यासोबतच समाजाचीही न भरून येणारी हानी झाली आहे.

प्रगल्भ प्रतिभावंत, पाली भाषेचे व बौद्ध तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, ओघवत्या वक्तृत्वाचे धनी डॉ. भाऊ लोखंडेंच्या निर्वाणाने मनाला अतिशय वेदना होत आहेत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मन वारंवार भरून येत असल्याचे कुमुदताईंनी सांगितले.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात पाली विषयाच्या विभागप्रमुख असलेल्या, अनेक संशोधनपर पुस्तकाच्या लेखिका, पुरस्कारप्राप्त मेधावी प्राध्यापिका डॉ. सुशीला मूलजाधव यांचेही जाणे असेच चटका लाऊन गेले, असे कुमुद पावडे म्हणाल्या.

मूळच्या नागपूरच्या असलेल्या सुशीलाचे शिक्षण मॉरीस कॉलेजमध्ये झाले.अजातशत्रु असलेल्या सुशीलामध्ये करुणेचा संस्कार ओतप्रोत भरलेला होता. सतत हसतमुख असलेल्या हव्याहव्याशा मैत्रिणीला आपण आता कायमचे दुरावलो, ही कल्पनाच घायाळ करणारी आहे. असे सांगत कुमुदताई म्हणाल्या माझ्या मैत्रिणीला शब्दसुमनांजली अर्पण करते.

सविस्तर वाचा - शहिद नरेश बडोले अनंतात विलीन, शहिद बडोले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वैद्यकीय सेवेचे व्रत आयुष्यभर जोपासणाऱ्या डॉ. नाना मेश्राम यांचेही जाणे असेच चटका लावणारे आहे. नानांनी अनेक गरीब रुग्णांवर मोफत उपचार करुन त्यांचे प्राण वाचवले आहेत. नाना म्हणजे माझ्या मैत्रिणीचा धाकटा भाऊ. म्हणजे माझ्या माहेरचा. अत्यंत निगर्वी, सुस्वभावी. नानाने सामाजिक बांधिलकी आयुष्यभर जपली. असे सांगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुमुद पावडे यांनी डॉ. नाना मेश्राम यांनाही भावसुमनांजली अर्पण केली.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three social images are no more