पोलिसांना बेशुद्ध दिसला भिक्षेकरी, मेयोत उपचार सुरू असताना कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचारामुळे बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. मेडिकलमधून शहरातील सहा जणांना सुटी देण्यात आली. यात मोमिनपुऱ्यातील पाच तर बाबा फरीदनगर येथील एकाचा समावेश आहे. त्यांना 14 दिवस घरी विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला.

नागपूर : शहरात शनिवारी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात एका भिक्षेकरीचाही समावेश आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच कोरोनाबाधितांचा आलेखही सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. शुक्रवारी तीन आणि शनिवारी तीन रुग्ण वाढल्यामुळे उपराजधानीतील रुग्णांची संख्या 413 वर पोहोचली आहे. 

पोलिसांना सेंटर एव्हेन्यू रोडवरील गांधी चौकात जवळपास 50 वर्षे वय असलेला एक भिक्षेरी बेशुद्ध दिसला. यामुळे पोलिसांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. त्याचे पोट फुगले होते. त्याच्यावर उपचार केल्यानंतर तो बरा होत असतानाच श्‍वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली. यामुळे सीएमओ डॉ. रणवीर यादव यांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्याचा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा - अल्पवयीन मुलगी सुट्ट्यांमध्ये मामाकडे राहायला आली अन् गर्भवती झाली; मग कुटुंबीयांनी पुण्यात केली प्रसूती

दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी एकाचदिवशी 20 रुग्णांची भर पडली. शुक्रवारी तिघांची वाढ झाली. दोन्ही रुग्ण गड्डीगोदाम येथील असून, त्यांना व्हीएनआयटी येथे विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. यात एका महिलेचा समावेश आहे. या दोघांचेही नमुने एम्स येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापूर्वीही गड्डीगोदाम येथील रुग्ण आढळून आले. मोमिनपुरा, सतरंजीपुरानंतर गड्डीगोदामही बाधितांच्या संख्येबाबत चिंताजनक ठरत आहे. याशिवाय नव्या भागांमध्येही कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. 

कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचारामुळे बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. मेडिकलमधून शहरातील सहा जणांना सुटी देण्यात आली. यात मोमिनपुऱ्यातील पाच तर बाबा फरीदनगर येथील एकाचा समावेश आहे. त्यांना 14 दिवस घरी विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला.

अधिक माहितीसाठी - होम क्वॉरान्टाईनचा शिक्‍का असलेल्या व्यक्‍तीचा रस्त्यावर तडफडून मृत्यू

कोरोनावर मात केल्यानंतर सहाही जण आनंदाने घरी परतले. मोमिनपुऱ्यातील रुग्णसंख्या दोनशेकडे वाटचाल करीत असतानाच पाच जणांना कोरोनावर मात केली. मोमिनपुरा येथील रुग्णांची संख्या सर्वाधिक 184 पेक्षा अधिक आहे. 21 मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या चारशेवर पोहोचली. 5 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाबाधिताची नोंद नागपूर शहरात झाल्यानंतर 21 मेपर्यंत मृतकांची संख्या 7 झाली आहे. 

बजेरिया परिसर सील

महापालिकेच्या महाल झोनमधील प्रभाग 19 मधील बजेरिया परिसरात भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्यात आले. यासंदर्भात आज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश काढले. बजेरिया नागेश्‍वर मंदिर परिसराच्या उत्तरपूर्वेस गणेश मंदिर, उत्तर-पश्‍चिमेस नन्नूमल बिल्डिंग, दक्षिण-पश्‍चिमेस शीतला माता मंदिर, दक्षिण-पूर्वेस एम्प्रेस मिल भिंतीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला. या क्षेत्रातील नागरिकांना क्षेत्राबाहेर जाता येणार नाही तसेच इतर भागातील नागरिकांना या क्षेत्रात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या क्षेत्रात वैद्यकीय सुविधा तसेच जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three were infected with corona in Nagpur on Friday