दिवसभर शेतात काम करून मजूर घरी येणार तेवढ्यात काळाने घातला घाला; वीज पडून तीन महिलांचा मृत्यू

संजय आगरकर
Monday, 12 October 2020

घटनेची माहिती कोंढाळीचे ठाणेदार श्‍याम गव्हाणे यांना भ्रमणधवनीवरून पोलिस पाटील शिवाभूषण, दत्तू पनासे व संजय नागपुरे यांनी दिली. ठाणेदार गव्हाणेंसह पोलिस उपनिरीक्षक राम ढगे, किशोर लोही घटनास्थळी शिवा येथे गेले. बेशुद्ध महिलांना लता मंगेशकर डिगडोह येथे उपचाराकरिता नेण्यात आले होते.

काटोल-बाजारगाव (जि. नागपूर) : वीज पडल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला व दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना कोटोल तालुक्यातील रिंगणाबोडी नजीकच्या एकलापार येथे रविवारी रात्री उशिरा घडली. जखमींना उपचारार्थ नागपुरात पाठविल्याची माहिती आहे.

रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. येथून तीन किलोमीटर अंतरावरील शिवा सावंगा येथील एलकापार शिवारात श्रावण इंगळे यांच्या शेतात कापूस वेचायला गेलेल्या महिला सायंकाळी सहा वाजता घरी येणार तेवढ्यात पावसासह विजेचा कडकडाट सुरू झाला. मजूर महिला शेताच्या बांधावरील झाडाखाली आश्रयाला गेल्या. झाडावर अचानक वीज कोसळल्याने झाडाखाली बसलेल्या महिला बेशुद्ध पडल्या.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! अन्न पाण्यावाचून पडून होता आजारी अवस्थेत; कोणी हात लावण्यासही नव्हते तयार; अखेर घडले माणुसकीचे दर्शन

शेतमालक श्रवण इंगळे धावत गावात आले. गावातून काही युवकांसह ते जीप घेऊन शेतात गेले. सर्व बेशुद्ध मजूर महिलांना उपचारासाठी लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह, हिंगणा येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यातील अर्चना उमेश तातोंडे (३६), शारदा दिलीप उईके (३५) व संगीता गजानन मुंगभाते (वय ३५, रा. शिवा) यांचा मृत्यू झाला. तर सत्यभामा श्रावण इंगळे (वय ३६), पंचफुला गजानन आसोले (वय ६०, रा. शिवा) या गंभीर जखमी असून, बेशुद्ध आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

घटनेची माहिती कोंढाळीचे ठाणेदार श्‍याम गव्हाणे यांना भ्रमणधवनीवरून पोलिस पाटील शिवाभूषण, दत्तू पनासे व संजय नागपुरे यांनी दिली. ठाणेदार गव्हाणेंसह पोलिस उपनिरीक्षक राम ढगे, किशोर लोही घटनास्थळी शिवा येथे गेले. बेशुद्ध महिलांना लता मंगेशकर डिगडोह येथे उपचाराकरिता नेण्यात आले होते.

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

गावात पसरली शोककळा

दिवसभर शेतात काम करून मजूर घरी येणार तेवढ्यात काळाने घाला घातला. यात तीन महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याची बातमी गावात पसरताच शोककळा पसरली. अचानक आलेल्या संकटामुळे पीडित परिवारावर महासंकट कोसळले आहे. घटनेची गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three women killed in lightning strike in Nagpur district