कोरोनाचा टिंबर मार्केटलाही फटका, एक लाख कामगारांवर उपासमारीची वेळ

timber
timber

नागपूर :  टाळेबंदीमुळे देशातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उपराजधानीतील टिंबर मार्केटची आर्थिक घडी विस्कटली आहे. शहरात सर्वाधिक 550 टिंबर मार्ट असून, त्यात दोन हजार आरामशीन आहेत. यात अंदाजे एक लाखापेक्षा अधिक कामगार काम करतात. टाळेबंदीमुळे बेरोजगार झाल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.

 टिंबर मार्केट बंद असल्याने या संबंधित व्यापारी, मजूर, वाहनधारकांची साखळी तुटली आहे. लाकडाची आयातही प्रभावित झाल्याने सरासरी 100 कोटींचा व्यवसाय ठप्प झाला आहे. नागपूर हे देशातील लाकडाच्या आयात आणि निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. राज्यात सर्वाधिक आरामशीन येथे आहेत. महिन्याला 50 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होते. एका आरामशीवर अंदाजे 50 कामगारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. मात्र, दोन महिन्यांपासून ठप्प झाल्याने 100 कोटींची उलाढाल प्रभावित झाली आहे.

नागपूर शहरात कॉनकॉरसह आणखी एक खासगी मालवाहतूक करणारे महत्त्वाचे डेपो आहे. दक्षिण अफ्रिका, घाना, म्यानमार, अमेरिका, ब्राझील, क्वोटीऍवेरी, नायझेरिया आदी देशांतून लाकडाची येथे आयात होते. त्यावर प्रक्रिया करून शहरातून दक्षिण भारतासह उत्तर भारतात लाकडे व कच्चा माल पाठविण्यात येतो. दक्षिण भारतात घराच्या दरवाजाला अजूनही लाकडी चौकट बसविण्यात येत असल्याने त्या भागात लाकडाची सर्वाधिक मागणी असते. यामुळेच या शहराची टिंबर सिटी म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे.

टाळेबंदीमुळे रेल्वे वाहतूक बंद असल्याने हा सर्वच व्यवसाय ठप्प झालेले आहेत. शहरातून दररोज 300 ट्रक, टेम्पोतून लाकडाची आवक जावक होत असते. तीही ठप्प झालेली आहे.जूनपासून पावसाळा सुरू होईल. ऑक्‍टोबरपर्यंत पावसाळा राहील. यानंतर हळूहळू टिंबर मार्केट पूर्वपदावर देऊ लागेल, अशी स्थिती आहे. कारण, ऑक्‍टोबर ते जून अशा काळातच येथील सर्वाधिक अर्थकारण गती घेत असते. पावासाळा सुरू झाला की, काम काहीसे ठप्प होते.

सध्या प्रत्येक व्यावसायिकांकडे लाखो रुपयांचा माल आपल्या गोडाऊनमध्ये आणून ठेवला. यानंतर हा माल विक्रीला सुरवात झाली होती. कोरोनाचा प्रभावामुळे टाळेबंदी केल्याने माल तशाच अवस्थेत गोदामात पडून असल्यानेही टिंबर मर्चंटचे संचालकही आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दोन महिन्यांपासून टिंबर मार्केट बंद असल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले असताना कामगारांवरही उपासमारीची वेळ आलेली आहे. आरामशीन रेड झोनच्या बाहेर आहेत त्या सुरू करण्याची परवानगी द्यावी. असे केल्यास कामगारांवरील उपासमारीचे संकट टळेल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कामगारांकडून काम करून घेण्यास बंधनकारक करण्यात येईल.
-फारुक अकबानी, माजी उपाध्यक्ष, नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशन.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com