धंद्यावरच आमच पोट हाय जी... गंगाजमुनातील वारंगनांवर उपासमारीची वेळ

अनिल कांबळे
गुरुवार, 21 मे 2020

लॉकडाउनमध्ये त्यांच्या समस्यांकडे बघायला कुणालाही वेळ नाही. "त्या' सध्या काय करतात, याचा विचारही कुणी केला नसेल. या बदनाम वस्तीमधील वारांगनांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन वेळेचे जेवण मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. 

नागपूर : मी पल्लवी... वय 34... राहणार मध्यप्रदेश... आता नागपुरातील गंगाजमुना वस्तीत राहते... वयाच्या 18 व्या वर्षांपासून येथील चिखलात रुतली आहे... अनेकदा या गलिच्छ वातावरणातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला... मात्र, दलाल आणि नातेवाईकांनी पुन्हा या व्यवसायात ढकलले... त्यामुळे आता मी बाहेर पडण्याचा प्रयत्नही करीत नाही... गंगाजमुनात राहण्याखेरीज माझ्याकडे पर्याय नाही... आज माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे... पोट धंद्यावरच आहे... मात्र, ग्राहकच येत नाही... काहीही सुचत नसल्याने आत्महत्येचा विचार मनात येते, अशी व्यथा एका वारांगनेने व्यक्त केली. 

कोरोनाचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसला आहे. नागपुरातील "रेड लाईट एरिया' असलेल्या गंगाजमुनातील वारांगनांनाही कोरोनाचा फटका बसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या जटील झाली आहे. लॉकडाउनमध्ये त्यांच्या समस्यांकडे बघायला कुणालाही वेळ नाही. "त्या' सध्या काय करतात, याचा विचारही कुणी केला नसेल. या बदनाम वस्तीमधील वारांगनांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन वेळेचे जेवण मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

सविस्तर वाचा - चौथ्या माळ्यावर एक वर्षाच्या मुलाला आई भरवत होती जेवण; पाण्याचा ग्लास घेण्यासाठी वळली अन्‌...

कोरोनामुळे देशात मार्च महिन्यात लॉकडाउन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकावरील मोठी वेश्‍यावस्ती म्हणून ओळख असलेली गंगाजमुना वस्ती बंद झाली. वस्तीला पोलिसांच्या सुरक्षेचा वेढा पडला. सुरुवातीचे दोन आठवडे जवळचे पैसे खर्च करून वारांगनांनी बसेबसे निभावले. त्यानंतर त्यांची फरपट सुरू झाली. त्यांच्यापुढे दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्‍न असल्याने वस्तीत काम करणाऱ्या तसेच जवळच्या वस्तीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शिधा जमवला. 

लॉकडाउन वाढल्याने या सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मदतीचा ओघही आटला. त्यामुळे त्यांचे अवस्था अधिकच बिकट झाले आहे. या भागातील नगरसेवकांनीही मदतीसाठी दुर्लक्षच केले. परिस्थिती बिघडल्याने अनेकींनी मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. ज्यांचे घर नाही त्या नाईलाजाने वस्तीतच राहत आहेत.

अधिक माहितीसाठी - 'मॉर्निंग वॉक' करणाऱ्या महिलांनी लॉजमध्ये पकडले एका जोडप्याला, अन्‌ मग झाले असे की...

घराची धरली वाट

आतापर्यंत या वस्तीत राहणाऱ्या अंदाजे साडेचार हजार तरुणी, महिला आणि वृद्ध वारांगनांनी घरची वाट धरल्याची माहिती आहे. लॉकडाएनच्या तिसऱ्या टप्प्यात थोडी शिथिलता मिळताच वारांगनांनी आपापल्या राज्यातील घरे गाठणे सुरू केले. सध्या वस्तीत 600 पेक्षा अधिक वारांगना राहत असल्याची माहिती आहे. काही सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था गंगाजमुनामध्ये धान्य वा जेवणाचे पाकीट वाटप करतात. मात्र, घरगुती वापराच्या अन्य सामानांची त्यांना आवश्‍यकता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time to starve the prostitutes in Gangajmuna