पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तीन वर्षांपूर्वी सुमारे 12 लाख रुपये खर्चून रुग्णहितासाठी टोकन सिस्टिम सुरू करण्यात आली. यासाठी नवीन सॉफ्टवेअर लावण्यात आले. संगणकीय प्रणाली कार्यान्वित झाली. मात्र, या टोकन सिस्टिमचा श्‍वास अवघ्या तीन महिन्यांतच थांबला. ही प्रणाली ठप्प पडल्यामुळे पुन्हा चिठ्ठीवरच नोंदणी करण्यात येऊ लागली. विशेष असे की, कंत्राटदाराकडून दुरुस्त करण्यात न आल्यामुळे 12 लाखांचा निधी पाण्यात गेला.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्नित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तीन वर्षांपूर्वी सुमारे 12 लाख रुपये खर्चून रुग्णहितासाठी टोकन सिस्टिम सुरू करण्यात आली. यासाठी नवीन सॉफ्टवेअर लावण्यात आले. संगणकीय प्रणाली कार्यान्वित झाली. मात्र, या टोकन सिस्टिमचा श्‍वास अवघ्या तीन महिन्यांतच थांबला. ही प्रणाली ठप्प पडल्यामुळे पुन्हा चिठ्ठीवरच नोंदणी करण्यात येऊ लागली. विशेष असे की, कंत्राटदाराकडून दुरुस्त करण्यात न आल्यामुळे 12 लाखांचा निधी पाण्यात गेला.
विदर्भासहित मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील सुमारे 30 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रुग्ण मेडिकल व सुपर स्पेशालिटी येथे उपचारासाठी येतात. विशेष असे की आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत संगणकीय प्रणालीतून रुग्णांची नोंदणी या योजनेतून होते. मात्र, येथे आल्यानंतर संगणकीय प्रणाली असलेली टोकन सिस्टिम बंद असल्याने अखेर रुग्णांना कागदी चिठ्ठ्या काढाव्या लागतात.

सविस्तर वाचा - आईने बाळाला वॉकरमध्ये ठेवले अन झाला घात

गरीब संवर्गातील हृदयापासून तर मेंदू, मूत्रपिंड, यकृत, पोटाच्या आजाराच्या गंभीर रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हा एकमात्र पर्याय आहे. आवश्‍यक यंत्रांसह तज्ज्ञ डॉक्‍टर येथे उपलब्ध आहेत. यामुळेच बाह्यरुग्ण विभागात मोठी गर्दी होते. तत्कालीन विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवर यांनी ही टोकन सिस्टिम कार्यान्वित केली होती. त्यासाठी आमदार प्रा. अनिल सोले यांनी निधीतून 12 लाख रुपयांचा निधी सुपर स्पेशालिटीला दिला होता. ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना किमान संगणकीय पावत्या दिल्या जात होत्या. परंतु, काही महिन्यातच ही यंत्रणा बंद पडली. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पावती देणेही बंद झाले आहे.

सॉफ्टवेअर करप्ट

टोकन सिस्टिम कार्यान्वित केल्यानंतर काही दिवसातच सॉफ्टवेअर करप्ट झाले. यामुळे दुरुस्ती करण्यासाठी सुपर प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला अनेक स्मरणपत्र दिले. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. दुरुस्तीअभावी या यंत्रणेवरील केलेला सारा खर्च पाण्यात गेला. या विषयावर सुपर प्रशासनाने कंत्राटदाराला नोटीस बजावली असल्याची माहिती आहे. विशेष असे की, दुरुस्ती न झाल्यास या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया केली जाईल, असे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Token system is on ventilator in Super Speciality