प्रेमाखातर स्वीकारला मुस्लीम धर्म अन् झाली दोन मुलांची आई, तरीही प्रेम विवाहाचा करुण अंत

अनिल कांबळे | Tuesday, 4 August 2020

शुक्रवारी आयशाचे मोहम्मदशी भांडण झाले. त्यामुळे आयशाने मध्यरात्री दीड वाजता अंगावर डिझेल घेऊन पेटवून घेतले. गंभीर जळालेल्या अवस्थेत आयशाला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोन ऑगस्टला आयशाचा मृत्यू झाला.

नागपूर : युवक व युवती... दोघेही पंचवीस वर्षांचे... एकमेकांच्या घरासमोर राहत होते. दोघांची ओळख झाली... ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले... घरच्यांचा विरोध झुगारून त्यांनी प्रेमविवार केला... मात्र, काही वर्षांतच प्रेमविवाहाचा करूण अंत झाला... युवतीने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याने सर्वांनी दुख व्यक्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनाली खोडे (२५) ही युवती पिटेसूर परिसरात राहत होती. तिच्या घरासमोर मोहम्मद शेख (२५) हा युवक राहतो. मोहम्मद हा मिनी ट्रक चालक आहे. शेजारी असल्यामुळे दोघांची ओळख झाली. ओळख प्रेमात रूपांतरीत झाली. दोघांच्याही चोरून लपून भेटी वाढल्या. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर दोघांनीही प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांचा विरोध झुगारून दोघांनी लग्न केले.

ठळक बातमी - काँग्रेसमध्ये गटबाजी : हा प्रकार बंद करा, नाही तर मी निघतो, कोणी दिला हा इशारा...

त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. काही वर्षांतच त्यांना एक मुलगी व मुलगा झाला. दोघेही आनंदात जीवन जगत होते. मात्र, अचानक त्यांच्यामध्ये खटके उडायला सुरुवात झाली. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली. त्यांच्यातील वाद विकोपाला जायला लागले. यामुळे दोघेही दुखी राहत होते.

अशात शुक्रवारी आयशाचे मोहम्मदशी भांडण झाले. त्यामुळे आयशाने मध्यरात्री दीड वाजता अंगावर डिझेल घेऊन पेटवून घेतले. गंभीर जळालेल्या अवस्थेत आयशाला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोन ऑगस्टला आयशाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आयशाचा भाऊ किशोर खोडे याच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर वाचा - भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक प्रगतीसाठी वळले या धानाकडे; बाजारात आहे अधिक भाव, वाचा...

मोनालीची झाली आयशा परवीन

मोनालीचे घरासमोर राहणाऱ्या मोहम्मदशी सूत जुळले. प्रेमात आकंठ बुडालेल्या दोघांनी घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला. प्रेमविवाह करण्यापूर्वी मोनालीने धर्म परिवर्तन केले. तिने लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला. ती मोनालीची आयशा परवीन झाली. तिने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मानकापुरात उघडकीस आली.

संपादन - नीलेश डाखोरे